दिव्यात घरातील फ्रिजला आग; रहिवासी आणि अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली
अमित जाधव - संपादक

ठाणे महानगरपालिका हद्दीतील दिवा पूर्व परिसरात शनिवारी दुपारी एका घरात फ्रिजला आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही.
शीळ अग्निशमन केंद्राला २७ जून २०२६ रोजी दुपारी २:४० वाजता आग लागल्याची माहिती मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
ही घटना चिन्मय गेटजवळील बेडेकर नगर, दिवा-आगासन रोड येथील तुलसी निवास या तळमजला + ५ मजली इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरील रूम क्रमांक ३०६ मध्ये घडली. संबंधित घराचे मालक श्री. जागनंदन पाल यांच्या घरातील फ्रिजला आग लागल्याचे प्राथमिक तपासात समोर आले.
घटनास्थळी अग्निशमन दलाचे एक फायर वाहन, एक रेस्क्यू वाहन तसेच टोरंट पॉवर कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते. रहिवाशांच्या मदतीने अग्निशमन दलाच्या जवानांनी आग पूर्णपणे आटोक्यात आणली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली असून परिसरातील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली.
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, याबाबत पुढील तपास सुरू आहे.



