*⭕️लेडी पोलीस सिंघमसाठी मुंब्रा शहरात नागरिक रस्त्यावर.
ही बदली अचानक झाली आहे. याबद्दल मला काहीही कल्पना नव्हती. मी नव्या ठिकाणीही कर्तव्य आणि निष्टेने काम करेन. – कृपाली बोरसे, सहायक पोलीस निरीक्षक
ठाणे, मुंब्रा ता 31 जाने ( संतोष पडवळ) : मुंब्रा पोलीस ठाण्यात गेल्या तीन ते चार महिन्यांपूर्वी हजर झालेल्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक कृपाली बोरसे यांनी कोरोनाच्या काळात अनेक गुन्हे उघडकीस आणले. महिलांचे गुन्हे हाताळताना त्यांना विश्वासात घेऊन त्यांना धीर दिला. कोरोनाचे निर्बंध पाळताना रात्री बंदीच्या वेळा काटेकोर पाळून रात्री घडणार्या गुन्ह्यावर अंकुश बसविला. तसेच रात्री रस्त्यावर फिरणार्या निराधार आणि अनाथ मुलांना आधार दिला.
मुंब्र्यात ड्रग्स आणि अन्य नशा येणार्या पदार्थांची तस्करी थांबवण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे अनेक तरुण मुले नशामुक्त झाले. म्हणून अनेक पालकांची चिंता कमी झाली होती. महिला आणि मुलींवरील अत्याचार कमी झाले होते. अशा चांगल्या काम करणार्या आणि अल्पावधीतच मुंब्र्यात गुन्हेगारांवर वचक बसविणार्या कर्तबगार पोलीस अधिकार्यांची अचानक बदली झाल्याने मुंब्रावासीयांना मोठा धक्का बसला. त्यांची बदली झाल्याचे येथील नागरिकांना समजल्यावर त्यांनी रविवारी रस्त्यावर उतरून त्यांच्या समर्थनार्थ हातात बॅनर घेत ’बोरसे मॅडम परत या, मॅडमची बदली रद्द करा’, अशा घोषणा देऊन रस्त्याच्या कडेला मानवी साखळी तयार केली. बोरसे यांची बदली राजकीय नेत्यांच्या दबावातून का पोलीस अधिकार्यांच्या दबावातून?, याची चर्चा मुंब्रा शहरात रंगली आहे.