दिवा आणि मुंब्रा परिसरात चौथ्या दिवशी ८२ अनधिकृत नळ जोडण्या खंडीत, २ गुन्हे दाखल..
अमित जाधव - संपादक

ठाणे (०५):* ठाणे महानगरपालिकेने दिवा आणि मुंब्रा परिसरात चौथ्या दिवशी केलेल्या कारवाईत ८२ अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या. तर, या प्रकरणी २ गुन्हे दाखल झाले आहेत. आतापर्यंत एकूण ४ प्रकरणात गुन्हे दाखल झाले आहेत.
यापूर्वी, तिसऱ्या दिवशी ५७ अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या होत्या. तर, पहिल्या दिवशी २९ नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या होत्या. दुसऱ्या दिवशी ४४ नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत.
कल्याण फाटा ते वाय जंक्शन येथे ०३ व्यावसायिक तर, २१ घरगुती अनधिकृत नळ जोडण्या खंडीत करण्यात आल्या. तसेच, ०५मोटर व पंप जप्त आणि एक अनधिकृत टँकर भरणा केंद्र बंद करण्यात आले. त्याचबरोबर, वाय जंक्शन ते मुंब्रा येथे ३५ निवासी अनधिकृत नळ संयोजन खंडीत करण्यात आले. दिवा चौक, महोत्सव मैदानजवळही २३ निवासी अनधिकृत नळ संयोजन खंडीत करण्यात आल्याची माहिती उपनगर अभियंता यांनी दिली.
महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अनधिकृत नळ जोडण्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे आणि नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्या मार्गदर्शनाखाली गेले चार दिवस मुंब्रा-दिवा प्रभाग समितीचा अतिक्रमण विभाग आणि पाणी पुरवठा विभाग यांनी संयुक्तपणे ही कारवाई करण्यात आली.