दिव्यातील ठामपा शाळा क्र. 88 मधील सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर : आयुक्त सौरभ राव* *अन्न व औषध प्रशासनाच्या अहवालानंतर दोषींवर कठोर कारवाई करणार..

ठाणे, (17) : ठाणे महापालिकेच्या दिवा आगासन येथील शाळा क्र. 88 मध्ये आज पोषण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांन मळमळ होत असल्याची लक्षणे दिसून आली. सदर घटनेची तात्काळ दखल घेवून छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाची तज्ज्ञ डॉक्टरांची टीम शाळेत पोहचली व त्यांनी विद्यार्थ्यांची प्राथमिक तपासणी करुन प्रथमोपचार दिले. या शाळेतील विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली. तसेच सदर प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
ठामपा शाळा क्र. 88 दिवा आगासन या शाळेत सकाळच्या सत्रात इयत्ता पाचवी ते सातवीतील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनामध्ये खिचडी देण्यात आली. परंतु थोड्यावेळानंतर काही विद्यार्थ्यांना मळमळ होत असल्याची लक्षणे दिसून आली, या घटनेची तात्काळ दखल घेत छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिरुद्ध माळगांवकर यांच्यासह वैद्यकीय टीम शाळेत दाखल झाली. या टीमने तात्काळ सर्व विद्यार्थ्यांची तपासणी करुन त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. तर काही विद्यार्थ्यांना छत्रपती महाराज रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले असले तरी सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. रुग्णालयात दाखल असलेल्या विद्यार्थ्यांची काळजी ठामपा प्रशासन व रुग्णालयाची तज्ज्ञ टीम घेत असल्याची माहिती शिक्षण विभागाचे उपायुक्त जी.जी. गोदेपुरे यांनी दिली.
सदर घटनेची माहिती अन्न व औषध प्रशासनाला देण्यात आली असून संबंधित विभागाचे पथक घटनास्थळी दाखल होवून त्यांनी अन्नाचे नमुने घेतले व संपूर्ण किचनची व परिसराची पाहणी केली. संपूर्ण चौकशीअंती संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असे आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केले.