दिवा स्टेशन जवळील बेशिस्त रिक्षा व वाहन चालकांवर कारवाई करा – दिवा शहरमनसे.*
अमित जाधव - संपादक
ठाणे, दिवा ता १८ जाने : दिवा शहरातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर आज मनसेचे दिवा शहर अध्यक्ष तुषार पाटील यांनी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश खेडेकर यांची भेट घेतली. दिवा चौक ते दिवा स्टेशन रेल्वे फाटका पर्यंतची संपूर्ण वाहतूक व्यवस्था ही कोलमडलेली आहे. दिवा रेल्वे फाटक परिसर हा बेशिस्त रिक्षाचालकांनी अक्षरशः व्यापून टाकलेला आहे तसेच रेल्वे पादचारी पुलाच्या समोर विना रांगेत रिक्षा उभ्या केल्या जातात. परिणामी दिवेकर रेल्वे प्रवाश्यांना रेल्वे स्थानकातून बाहेर पडणे जिकरीचे होते. त्याशिवाय मनमानी पद्धतीने कुठेही रिक्षा उभ्या करणे , रिक्षा रांगेत न लावणे, बॅच किंवा गणवेश परिधान न करणे , विना परवाना रिक्षा चालवणे, मोडकळीस आलेल्या (स्क्रॅप) रिक्षांमधून प्रवाशांची वाहतूक करणे, जवळच्या ठिकाणची भाडी नाकारणे असे प्रकार दिवा शहरात सर्रास सुरू आहेत. त्यामुळे अशा रिक्षाचालकांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी दिवा मनसे कडून करण्यात आली आहे.
सोबतच दिवा शहरातील वाहतुकीचे योग्य नियमन केले गेल्यास शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल असेही मनसेने आपल्या पत्रात म्हटले आहे. यावेळी त्यांच्या सोबत शहर सचिव प्रशांत गावडे, विभाग अध्यक्ष प्रकाश पाटील आणि उपविभाग अध्यक्ष गणेश भोईर हेही उपस्थित होते.