दिवा ग्रामस्थ व शिवसेना दिवा उपशहरप्रमुख अँड.आदेश भगत यांच्या पुढाकाराने दिवा शहर पश्चिमेला भव्य मिरवणूक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून मिरवणुकीत पुणेरी ढोल, पारंपरिक वेशभूषा, शिवकालीन खेळांची प्रात्यक्षिके अशा इतर विविध गोष्टींचा समावेश असणार आहे. सदर मिरवणूक कुलस्वामिनी मंदिर, दिवा पश्चिम येथून सुरू होऊन मिरवणुकीची सांगता साई मंदिर क्रिश कॉलोनी येथे होणार आहे. मिरवणूक सोहळ्याची सांगता झाल्यानंतर साई मंदिर, क्रिश कॉलनी येथे महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ देखील आयोजित करण्यात आला आहे. दिवा शहर पश्चिमेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त निघणाऱ्या पालखी मिरवणूक सोहळ्याचे यंदाचे दुसरे वर्ष आहे, दिवा शहराच्या पूर्व भागात शिवजयंती निमित्ताने विविध ठिकाणी अनेक कार्यक्रम, मिरवणूक आदी कार्यक्रम केले जातात, दिवा शहराच्या पश्चिम भागात देखील महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी झाली पाहिजे अशी इच्छा दिवा शहर पूर्वेतील शिवभक्त नागरिकांनी व्यक्त केल्यानंतर आम्ही या सोहळ्याचे आयोजन केले असल्याचे प्रमुख आयोजक अँड.आदेश भगत यांनी सांगितले. गेल्यावर्षी या मिरवणुकीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता या वर्षी देखील नागरिकांनी मिरवणूक सोहळ्यात मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन अँड.आदेश भगत यांनी केले आहे.