*⭕️प्रसिद्ध उद्योजक राहुल बजाज यांचं पुण्यात निधन.*
पुणे, 12 फेब्रुवारी : प्रसिद्ध उद्योजक, देशातील प्रसिद्ध कंपनी असलेल्या बजाज समूहाचे आधारस्तंभ राहुल बजाज यांचं निधन झालं आहे. पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 83 वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे देशाची खूप मोठी हानी झाली आहे. त्यांच्या निधनामुळे भारतीय उद्योगसमूहात खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ते तरुण उद्योजकांसाठी एक प्रेरणास्त्रोत होते. त्यांच्या निधनामुळे बजाज समूहाचं वैयक्तिक खूप मोठं नुकसान झालं आहे. बजाज उद्योग समूहाला वाहन उद्योगात मोठे करण्यात राहुल बजाज यांचा मोठा वाटा आहे. राहुल बजाज यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
राहुल बजाज यांचे पार्थिव उद्या सकाळी 11 वाजता अंत्यदर्शनासाठी आकुर्डी येथील कंपनीत ठेवलं जाणार आहे. त्यानंतर संध्याकाळी 4 वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.
राहुल बजाज यांचा जन्म 10 जून 1938 चा. राहुल बजाज हे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि सामाजिक कार्यकर्ते जमनालाल बजाज यांचे नातू होते. दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टिफन कॉलेजमध्ये इकॉनॉमिक ऑनर्स केल्यानंतर राहुल बजाज यांनी 3 वर्षं बजाज इलेक्ट्रिकल्स कंपनीमध्ये प्रशिक्षण घेतलं होतं. त्यांनी मुंबई विद्यापीठातून कायद्याचं शिक्षणही घेतलं होतं. त्यानंतर त्यांनी 60 च्या दशकात हॉवर्ड बिझनेस स्कूलमधून एमबीएची पदवी घेतली होती.


