महापालिकेची तिजोरी फोडणाऱ्यांना मुंबईचा लढा आठवला,शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उबाठावर हल्लाबोल.. *महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुकंले,शिवसेना राज्यात राबवणार लाडकी सून अभियान…
अमित जाधव - संपादक

मुंबई, ता. १९ जून २०२५ राक्षसाचा जीव जसा पोपटात असतो, तसा त्यांचा जीव बीएमसीच्या तिजोरीत आहे. इतकी वर्ष सत्तेत राहुन महापालिकेची तिजोरी फोडणाऱ्यांना मुंबईचा लढा आठवला, अशा शब्दांत शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठावर हल्लाबोल केला. मुंबई महाराष्ट्राचीच राहणार, कुणाचा बाप जरी आला किंवा सात पिढ्या खाली उतरल्या तरी मुंबई महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ठणकावून सांगितले.वरळी डोम येथे आयोजित शिवसेनेच्या ५९ व्या वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा तर दुसरा मेळावा सत्तेसाठी लाचार झालेल्यांचा आहे. आपण बाळासाहेबांचा विचार जिवापाड जपलं. त्यामुळेच शिवसेनेची घोडदौड जोरात सुरू आहे, असे ते म्हणाले. सरडाही रंग बदलतो, पण यांच्या इतके लवकर नाही. बाळासाहेबांनी हिंदुत्वासाठी मतदानाचा अधिकार गमावला, पण हिंदुत्व सोडलं नाही. पण त्यांचे वारसदार म्हणवणारे सत्तेसाठी लाचार झाले. बाळासाहेब असते तर यांना उलटं टांगून खालून मिरचीचा धूर दिला असता, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली. आज ज्यांना मराठी माणसाची आठवण होत आहे त्यांच्यामुळेच मराठी माणूस मुंबईबाहेर गेला, आता मराठीच्या नावाने गळे काढत आहेत अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठावर केली.
कोविड सेंटर, खिचडी, बॉडीबॅग, कचरा, मिठी नदी गाळ, रस्त्यांवर खड्डे आणि डांबरात पैसे खाल्ले आणि मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ केलात. आता त्यांना मुंबईचा लढा आठवला. इतकी वर्ष तुम्ही सत्तेत होता. तेव्हा पालिकेची तिजोरी फोडली आणि आता सत्ता गेल्यावर मुंबईचा लढा आठवलाय, अशी बोचरी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली. लढण्यासाठी घराबाहेर पडावं लागते. लोकांशी संवाद साधावा लागतो. आता तुम्ही जे काही बाहेर पडताय ते आमच्यामुळे पडताय, असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला. मिठी नदीच्या मगर मिठीतून कोणी सुटणार नाही. मिठी नदीच्या मगरमिठीतून कोणी सुटणार नाही. आता एकाची चौकशी सुरु आहे, त्याने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल, असे ते म्हणाले.
ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची भूमिका पटवून देण्यासाठी खासदारांच्या शिष्टमंडळासोबत परदेश दौऱ्यावर गेलेल्या खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार मिलिंद देवरा यांचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी कौतुक केले. भारतीय लष्कराने फक्त २० मिनिटांत पाकिस्तानची चरबी उतरवली. मात्र शाबासकी देऊन पाकिस्तानची भाषा काहीजण बोलत आहेत त्यांना निशाण ए पाकिस्तान पदवी द्यायला हवी. भारतात झिरो आणि पाकिस्तानात हिरो बनलेल्या राहुल गांधींवर उपमुख्यमंत्री शिंदे सडकून टीका केली.
मुंबईतील उबाठाचे ५० विद्यमान नगरसेवक इतर पक्षातले ६० ते ६५ नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले आहेत. येत्या निवडणुका महायुतीतच लढायच्या आहेत. कार्यकर्त्यांनी निवडणुका जिंकण्याच्या कामाला लागा, असे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले. महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत आणि ग्राम पंचायतीवर महायुतीचाच भगवा फडकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.