दिवा मुंब्रा दरम्यान धावत्या रेल्वेतून गर्दुल्ल्याने फेकले इस्मावर एसिड….
अमित जाधव - संपादक
”गर्दुल्ल्याचा त्रास हा दिवसेंदिवस लोकल गाड्यात तसेच स्थानक परिसरात वाढत चालला आहे. लोहमार्ग पोलीस तसेच रेल्वे सुरक्षा बलाने अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. विशेषतः मुंब्रा रेल्वे स्थानक आणि परिसरात प्रवाशांवर दगडफेक, चालत्या गाडीत प्रवाशांच्या हातावर मारणे, गर्दुल्यांचा वावर खूप जास्त आहे. सुविधांचा विचार करताना प्रवाशांच्या सुरक्षेचा प्राधान्याने विचार केला पाहिजे.”
अँड.आदेश भगत
अध्यक्ष, दिवा रेल्वे प्रवासी संघटना
ठाणे – धावत्या रेल्वेत एका दिव्यांग व्यक्तीला गर्दुल्याने जाळण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना काल शनिवार रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. या हल्ल्यात जखमीचा डावा हात पूर्णपणे होरपळला असून नजीकच्या रुग्णालयातून त्यांना केईएम रुग्णालयात हलविण्यात आले असून सद्या उपचार सुरू आहेत. सध्या ठाणे लोहमार्ग पोलिसांचे पथक रुग्णालयात असून, जखमीचा जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे.प्रमादे वाडेकर (अंदाजे वय ३५) असे जखमीचे नाव आहे. तो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण या लोकलमधील दिव्यांगांच्या राखीव डब्यातून प्रवास करत होता. प्रवासादरम्यान लोकल कळवा मुंब्रा स्थानकात येताच एका गर्दुल्याने त्याच्या सोबत हुज्जत घातली. त्यानंतर नशेसाठी वापरला जाणारा द्रव पदार्थ त्या दिव्यागाच्या अंगावर फेकून माचीस पेटवून आग लावली. यामध्ये दिव्यांग प्रमोद वाडेकर हा गंभीर जखमी झाला. त्याचा डावा हात होरळपला. या घटनेतील संशयीत आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती ठाणे लोहमार्ग पोलीस स्टेशनचे पंढरी कांदे यांनी दिली आहे पुढील तपास सुरू असून अद्याप आरोपी मोकाट आहे.