काल्हेर खाडीत तरंगल्या साहित्य लहरी कोमसापचे पहिले सागरी साहित्य संमेलन संपन्न..!
अमित जाधव - संपादक
♦
ठाणे :
मराठी भाषा संवर्धनासाठी अग्रेसर असलेल्या आणि विविध अभिनव उपक्रम राबविणाऱया कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ठाणे शहर शाखेने एका सागरी साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते. शनिवार 13 एप्रिल रोजी ठाण्याजवळील काल्हेर खाडीत बोटीमध्ये झालेल्या या सागरी संमेलनास अध्यक्ष म्हणून कवी, लेखक किरण येले तर प्रमुख पाहुणे म्हणून बोली भाषेचे पुरस्कर्ते कवी गजानन पाटील लाभले. ठाणे शहर अध्यक्ष ऍड. मनोज वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली झालेले हे कोमसापच्या इतिहासातील बोटीवर झालेले पहिलेच साहित्य संमेलन ठरले.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात किरण येले यांनी कोमसाप ठाणे शहर राबवित असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. मराठी भाषा संवर्धनासाठी आता अशा ‘पॉकेट संमेलनां’ची गरज आहे. भाषा संवर्धन ही एक चळवळ असून ती एखाद्या संत्संगाप्रमाणे चालविली पाहिजे. एकास एक सदस्य जोडूनच ही चळवळ वाढत जाईल. ही चळवळ शाळाशाळांमधून राबविल्यास भाषा अभिमानाची एक सुसंस्कृत पिढी तयार होईल, असे उद्गार श्री. येले यांनी काढले. अंबरनाथ येथे निर्माण केलेल्या भारतीय वृक्षांच्या मानवी जंगलात आता एक ‘जंगल साहित्य संमेलन’ आयोजित करा, असे आमंत्रण श्री. येले यांनी दिले.
संमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना बोलीभाषेचे पुरस्कर्ते गजानन पाटील यांनी सांगितले, बोलीभाषा टिकली तरच मराठी भाषा टिकेल. त्यासाठी बोलीभाषांचा स्वीकार शहरी साहित्यिकांनी केला पाहिजे. ‘ण’ ‘न’ ‘ळ’ ‘ल’ असा भाषावाद न करता बोलीभाषेतील साहित्याचाही सन्मान करावा, असे मनोगत श्री. पाटील व्यक्त केले. आगरी भाषेतील वात्रटिकेने श्री. पाटील यांनी उपस्थितांचे मनोरंजन केले.
सुरुवातीला कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मनोज वैद्य यांनी मराठी भाषा संवर्धनासाठी शहर शाखेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. बंद सभागृहांमधील साहित्य संमेलनातून आता बाहेर पडून अशा निसर्गाच्या सान्निध्यात खुल्या वातावरणात साहित्य अधिक बहरेल. गर्दी जरी नसली तरी दर्दी अशा संमेलनांत सहभागी होतील, असे मनोज वैद्य यांनी सांगितले. यापुढील वर्षा साहित्य संमेलन हे बदलापूरमधल्या एका डोंगरावर आयोजित करण्याचे त्यांनी यावेळी घोषीत केले.
या कार्यक्रमात सहभागी झालेल्या तीस सभासदांनी आपापली कविता, लघुलेख सादर केले, नवीनच सभासद झालेल्या अश्विनी बेलखेडे आणि स्वाती निमकर यांनी ऐनवेळी सादर केलेल्या कवितांना उपस्थितांनी दाद दिली. प्रिया पाटील आणि परी भोईर या स्थानिक शाळकरी मुलींनी कोळी भाषेतील गाणे आणि कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. पंकज पाडाळे यांनी केलेल्या भारुड नृत्य आणि कोळी नृत्याने कार्यक्रमाची सांगता झाली.
डॉ. प्रतिक्षा बोर्डे आणि पंकज पाडाळे यांनी कार्यकारिणी सदस्यांच्या सहाय्याने संमेलनाचे नेटके आयोजन केले तर माधुरी बागडे अलई यांनी खुमासदार शैलीत सूत्रसंचालन केले.



