*⭕️ग्राहक संरक्षण कायदा आता मराठीत*
मुंबई, ता 7 जाने ( संतोष पडवळ) : केंद्रशासनाने अधिनियमित केलेल्या ग्राहक संरक्षण अधिनियम, २०१९ व त्याखालील विविध नियम आणि विनियमांमध्ये व्यापार उदीम व खरेदी-विक्रीच्या पद्धतींमध्ये तंत्रज्ञानातील झालेले बदल विचारात घेऊन बऱ्याच नवीन तरतुदी करण्यात आल्या आहेत. हा केंद्रीय अधिनियम असून हा कायदा व त्याखालील नियम विनियम इंग्रजी मध्ये असल्याने या ग्राहकाभिमुख तरतुदी असल्यातरी त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहचण्यास अडचणी येतात व परिणामी या कायद्याचा मूळ हेतु अपेक्षे प्रमाणे साध्य होण्यासही मर्यादा येतात. हे विचारात घेऊन पूर्वाश्रमीचे ग्राहक तक्रार निवारण मंचाचे प्रबंधक व सेवानिवृत्त सहायक नियंत्रक वैध मापनशास्त्र श्री. बाळासाहेब झावरे यांनी हा कायदा व त्याखालील नियम आणि विनियम यांचे मराठीमध्ये भाषांतर करून ते ‘कालसापेक्ष ग्राहक संरक्षण अधिनियम, २०१९’ या पुस्तकात एकत्रित करून जनतेसाठी उपलब्ध केले आहे. त्याचा प्रकाशन सोहळा दि २ जानेवारी २०२२ रोजी पनवेल येथे पार पडला.
पनवेल महानगर पालिकेचे माजी स्थायी समितीचे सभापती, नगरसेवक श्री मनोहर म्हात्रे हे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे होते आणि अॅड.डी. एस. पराडकर, सदस्य दक्षिण मुंबई जिल्हा, ग्राहक तक्रार निवारण आयोग, कोठावळे प्रकाशनचे श्री. बाबासाहेब कोठावळे, अॅड. श्री महादेव ढोणे, सुखम हॅास्पिटलचे डॉ. संतोष जाधव, नोसिल कंपनीचे डेप्युटी जनरल मॅनेजर (आर. अॅंड डी.) डॉ. विकास पाडळकर, वैध मापन शास्त्र विभागातील रायगड जिल्ह्याचे उपनियंत्रक वैध मापनशास्त्र श्री. रामसिंग राठोड, सेवानिवृत्त उपनियंत्रक श्री एन. डि. सूर्यवंशी व जेष्ठ प्रशिक्षक, समुपदेशक आणि साहित्त्यिक व ‘माणसं लग्न का करतात?’ या पुस्तकाचे लेखक श्री अनिल उदावंत, श्री संतोष लंके, तुकामाई रोडलाईन्स, श्री तानाजी निकम, अनिल ट्रान्सपोर्ट आणि भरतभाई पतौडिया, सद्गुरू ईन्फ्रा प्रोजेक्टस ईं प्रा. लि. आणि मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अॅड राजेशजी टेकाळे साहेब अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला.
या पुस्तकासाठी मा. ना. श्री छगनरावजी भुजबळ, मंत्री, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, महाराष्ट्र यांची प्रस्तावना असून, माजी केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्री श्री. शरद पवार, महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष डॅा संतोष काकडे व सूर्यकांत गवळी, माजी अध्यक्ष (मंत्री स्थरीय) ग्राहक कल्याण सल्लागार समिती, महाराष्ट्र यांनी शुभेच्छा या पुस्तकासाठी दिल्या असून हे सर्व या पुस्तकात अंतर्भूत करण्यात आले आहे.
या पुस्तकात कायदा व त्याखालील नियम आणि विनियम मराठीमध्ये आहेत. याशिवाय हा नविन कायदा करण्याची गरज निर्माण होण्यासाठीची पार्श्वभुमी, तक्रार अर्ज, अपील अर्ज, विलंब माफीचा अर्ज आणि अंमलबजावणी अर्ज यांचे नमुने, तक्रार अर्ज तयार करण्यासाठी आवश्यक त्या सूचना/मार्गदर्शन आणि राज्यातील ग्राहक आयोगाचे पत्ते दूरध्वनी व ई-मेल पत्ते आणि विविध राज्यांचे ग्राहक हेल्पलाईन इ. समाविष्ट केलेले असल्याने यांचा उपयोग सर्वसामान्य जनता, ग्राहक आणि जिज्ञासूंना होईल. तसाच तो ग्राहक आयोगातील पीठासीन अधिकारी, वकील व आयोगाशी संबंधित मध्यस्थ आणि शासनाच्या विविध अधिकाऱ्यांनाही होईल. याशिवाय ई-कॉमर्स एन्टिटी, व्यवसाईक आणि व्यापारी यांच्या दृष्टिकोनातूनही हे पुस्तक महत्वाचे आहे.
ग्राहक संरक्षण कायदा आता शालेय शिक्षण/महाविद्यालयीन अभ्यासक्रमातही समाविष्ट करण्यात आला असल्याने विद्यार्थ्यानाही या पुस्तकाचा निश्चित फायदा होईल. एकंदरीत ग्राहक प्रबोधनासाठी महत्वाचे असलेले हे पुस्तक एक संदर्भ पुस्तक म्हणून हे सर्वांसाठी उपयुक्त ठरेल.


