क्रेडाई-एमसीएचआय’च्या प्रदर्शनाात २१४ घरांची विक्री, ७४५ कोटींचे कर्ज प्रस्ताव दाखल २९ हजारांहून अधिक नागरिकांची प्रदर्शनाला भेट, अध्यक्ष जितेंद्र मेहता यांची माहिती..
अमित जाधव - संपादक

ठाणे, दि. १० : क्रेडाई एमसीएचआय ठाणे मेंबर उदय सुरेश भाई ठक्कर यांनी सांगितले `क्रेडाई-एमसीएचआय, ठाणे’ यांच्या वतीने ठाण्यात आयोजित केलेल्या प्रॉपर्टी प्रदर्शन – २०२५ ला घर व कार्यालय खरेदी करणाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, २९ हजार १६३ नागरिकांनी प्रदर्शनाला भेट दिली. तर २१४ ग्राहकांनी घर खरेदी केले असून, ७४५ कोटी रुपयांच्या गृह कर्जाचे प्रस्ताव बॅंका व वित्त संस्थांकडे दाखल करण्यात आले आहेत. `क्रेडाई-एमसीएचआय’च्या लाडकी बहीण योजनेतही अनेक महिलांनी उत्सूकता दाखविली. या प्रदर्शनाच्या माध्यमातून ठाणेकरांना स्वप्नातील घर मिळवून देऊ शकलो, याबद्दल `क्रेडाई-एमसीएचआय, ठाणे’चे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी आनंद व्यक्त केला.
ठाण्यातील हायलॅण्ड गार्डन येथील मैदानावर ७ फेब्रुवारीपासून चार दिवस प्रॉपर्टी प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनात ठाणे शहर व परिसरातील ४० हून अधिक प्रसिद्ध विकसक, १० हून अधिक राष्ट्रीयीकृत बॅंका व गृह वित्तपुरवठादार संस्थांसह रिअल इस्टेट संबंधी संस्थांचे स्टॉल मांडण्यात आले होते. या प्रदर्शनाला पहिल्या दिवसापासून नागरिकांचा प्रतिसाद मिळाला होता. सुमारे ३० लाखांपासून ३ कोटी रुपयांपर्यंतची विविध स्तरातील घरे उपलब्ध होती. त्याला घरखरेदीसाठी इच्छूकांनी चांगला प्रतिसाद दिला. या प्रदर्शनाच्या माध्यमातून घरखरेदीसाठी इच्छूक शेकडो नागरिकांनी घरांची माहिती घेतली असून, ते लवकरच घर पसंत करतील, अशी माहिती अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी दिली. या प्रदर्शनाला भेट देता न आलेल्या नागरिकांना क्रेडाई-एमसीएचआयच्या वेबसाईटवर पुढील ३ महिने प्रदर्शन पाहता येईल, असे मेहता यांनी सांगितले.
या प्रदर्शनाच्या यशस्विततेसाठी `क्रेडाई-एमसीएचआय’चे सर्व पदाधिकारी, प्रदर्शन समितीने चांगली मेहनत केली. घर व कार्यालयांच्या जागेची माहिती देण्याबरोबरच या प्रदर्शनात ठाणे शहरातील उत्कृष्ट हौसिंग सोसायट्या, रिअल इस्टेट सदस्यांसाठी कार्यशाळा, महारेरा कायद्यातील तरतूदी व कायद्याबाबत माहिती देणारे परिसंवाद भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाच्या यशामुळे मुंबई महानगर क्षेत्रात सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या सांस्कृतिक व सुरक्षित ठाणे शहरातील वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प व विकासकामांना नागरिकांची पसंती असल्याचे स्पष्ट झाले. ठाण्यातील उत्तम जीवनशैलीला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला, असे श्री. मेहता यांनी सांगितले.
ठाणे शहर व परिसरात घर खरेदी करणाऱ्यांसाठी `क्रेडाई-एमसीएचआय’चे प्रदर्शन हे विश्वासार्ह व्यासपीठ असल्याचे पुन्हा सिद्ध झाले. गेल्या २२ वर्षांपासून आम्ही ग्राहकांचा विश्वास जिंकण्यात यशस्वी झालो. यापुढील काळातही ठाण्याच्या विकासाबरोबरच सामाजिक बाबींसाठी आम्ही योगदान देऊ, असे `क्रेडाई-एमसीएचआय, ठाणे’चे गत अध्यक्ष अजय आशर यांनी सांगितले.
ठाण्यात रिअल इस्टेट क्षेत्राचा वेगाने विकास होत असून,यंदाही प्रदर्शनाच्या माध्यमातून हजारो ग्राहकांपर्यंत पोचता आले, याचा आनंद वाटत असल्याचे प्रॉपर्टी प्रदर्शन समितीचे अध्यक्ष संदीप माहेश्वरी यांनी सांगितले. या प्रदर्शनात अनेक वैशिष्टयपूर्ण, उत्तम जीवनशैली आणि परवडणाऱ्या प्रकल्पांचा समावेश होता. या प्रदर्शनाला भेट न देता आलेल्या ग्राहकांनी आवर्जून इंटरनेटवरून www.credaimchi.com या वेबसाईटवर प्रदर्शन पाहावे, असे आवाहन सचिव मनिष खंडेलवाल यांनी केले.
वैशिष्ट्यपूर्ण स्टॉल व विकसकांचा गौरव
प्रॉपर्टी प्रदर्शनात वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या विकसक व बॅंकांच्या स्टॉलचा सन्मानचिन्ह देऊन आज गौरव करण्यात आला. अध्यक्ष जितेंद्र मेहता, भावेश गांधी, फैयाज मिरानी, मंथन मेहता यांनी पुरस्कार विजेत्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला.
यंदा `मोस्ट इनोव्हेटिव्ह ब्रॅण्ड कम्युनिकेटर ऑफ द इयर’ म्हणून रुस्तमजी ग्रूपला, बेस्ट डेब्यूट स्टॉलसाठी एल अॅण्ड टी रिअॅलिटी, बेस्ट एचएफसी स्टॉल म्हणून बॅंक ऑफ महाराष्ट्रला प्रथम, तर यूनियन बॅंक ऑफ इंडियाला द्वितीय पुरस्कार देण्यात आला. बेस्ट कन्झ्युमर अवेअरनेस इनिशिएटिव्ह फॉर प्रधानमंत्री आवास योजनेसाठी गृहम हौसिंग फायनान्सला गौरविण्यात आले. तर नारंग रिअॅलिटी अॅण्ड कोर्टयार्ड रिअल इस्टेट यांनी बेस्ट इन्फॉर्मेटिव्ह स्टॉल म्हणून बाजी मारली. बेस्ट डिझाईन स्टॉलसाठी प्रथम क्रमांक विहंग ग्रूप आणि द्वितीय क्रमांक एकत्व ग्रूपला मिळाला.