ठाणे महापौर पदासाठी कोणाची वर्णी..सात चेहऱ्यांमध्ये दिव्याचे नगरसेवक दीपक जाधव यांचे नाव आघाडीवर….
अमित जाधव- संपादक

ठाणे महापालिका निवडणुकीसाठी काही महिन्यांपूर्वी प्रभाग आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली. त्यात एकूण १३१ जागांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले होते. यामध्ये अनुसूचित जातीसाठी ९, अनुसूचित जमातीसाठी ३, नागरिकांचा मागासवर्ग (ओबीसी) ३५ आणि सर्वसाधारण ८४ जागांचा समावेश आहे. यात यात ३ (अ) महिला, ६ (महिला), ६ (अ) महिला, ७ (अ) महिला, ९ (अ), १५ (अ), १६ (अ), २२ (अ) महिला, २४ (अ) महिला, २८ (अ) हे प्रभाग अनुसुचित जातींसाठी आरक्षित झाल होते. विशेष म्हणजे ठाणे महापौर पदासाठी यंदा अनुसूचित जाती प्रवर्गाचे आरक्षण जाहीर झाले असून या प्रभागातून निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी एकाच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडणार असून या पदासाठी आता राजकीय हालचालींना वेग आला आहे.
ठाणे महापालिकेची निवडणूक शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांनी युतीत लढवली होती. यामध्ये अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या सात जागा शिंदे सेनेने लढवल्या होत्या तर दोन जागा भाजपने लढवल्या होत्या. पालिकेत शिंदे सेनेने ७५ नगरसेवक निवडून आणत बहुमताचा आकडा पार केला असून त्यांचा महापौर होणार असल्याचे बोलले जात आहे.
या नगरसेवकांच्या नावाची चर्चा
शिंदेच्या शिवसेनेकडून अनुसूचित जाती प्रवर्गातील तब्बल सात नगरसेवक निवडून आले आहेत. यामध्ये प्रभाग ३ (अ) महिला – पद्मा भगत, ६ (अ) महिला – वनिता घोगरे, ७ (अ) महिला – विमल भोईर, ९ (अ) – गणेश कांबळे, १६ (अ) – डॉ. दर्शना जानकर, २४ (अ) महिला – आरती गायकवाड आणि २८ (अ) दीपक जाधव यांचा समावेश आहे. त्यामुळे महापौर पदासाठी शिंदे सेनेतून कोणाचे नाव पुढे येणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. याशिवाय कोपरी येथील सर्वसाधारण प्रभागातून निवडणूक लढवलेल्या शर्मिला पिंपोळकर यांचेही नाव चर्चेत असून, राजकीय समीकरणे बदलल्यास त्यांनाही संधी मिळू शकते, अशी चर्चा आहे.



