मालमत्ता कर व पाणी पट्टी वसुली गंभीरपणे वसुल करून २ लाखावरील थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई करण्याचे ठाणे महापालिका आयुक्तांचे आदेश…..
अमित जाधव-संपादक
*⭕️मालमत्ता कर व पाणी पट्टी वसुली गंभीरपणे वसुल करून २ लाखावरील थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई करण्याचे ठाणे महापालिका आयुक्तांचे आदेश.*
पाणी बिलाच्या वैयक्तिक थकबाकीदारांवरही होणार कारवाई
ठाणे (2 फेब्रुवारी, संतोष पडवळ ): शहरात १०० टक्के कर वसुली करण्याच्यादृष्टीने मालमत्ता कर आणि पाणी पट्टी कर वसुली गंभीरपणे करण्याचे आदेश देतानाच २ लाखावरील थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई करण्याचे कडक आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी आज सर्व अधिका-यांना आणि विभागप्रमुखांना दिले. दरम्यान सोसायटीमध्ये वैयक्तिक पाणी पट्टी थकबाकी असणाऱ्या सदनिकाधारकांवरही यापुढे कडक कारवाई करण्यात येणार आहे.
महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी ठाणे महापालिकेच्या नागरी संशोधन केंद्र येथे सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेवून विविध विभागनिहाय वसुलीचा आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त आयुक्त(१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त(२) संजय हेरवाडे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख आदी उपस्थित होते.
दरम्यान प्रभाग समितीनिहाय वसुलीचे जे उदिष्ट दिले आहे ते उदिष्ट कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्यासाठी गंभीरपणे काम करण्याविषयी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.
यावेळी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी मालमत्ता कर वाढविण्यासाठी सर्व सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता, कर निरीक्षक यांनी आपल्या स्तरावर वसुलीसाठी कठोर पावले उचलावित असे सांगितले. त्याचप्रमाणे पाणी वसुलीबाबत विभागाने वेळेत पाणी बिलांचे वितरण करून वसुली करावी अशा सक्त सूचना सर्व अधिका-यांना दिल्या.
तसेच शहरातील ज्या सोसायट्यामध्ये वैयक्तिक पाणी पट्टी कराची थकबाकी आहे, त्या सदनिकाधारकांची नावे जाहीर करून त्यांच्यावरही यापुढे कडक कारवाई करण्यात येणार आहे.
आज अखेर अंदाजे ४९१.४७ कोटी मालमत्ता कराच्या स्वरूपात वसुली झाली आहे. सदरची वसुली ही निर्धारित इष्टांकाच्या ६६ टक्केपेक्षा जास्त झाली आहे. महापालिकेच्या एकूण १५९ ब्लॉकमधील जवळपास ५,४३,५२० मालमत्ता कराची देयके वितरित करण्यात आली आहेत.


