श्री समर्थ शाळेतील माजी विद्यार्थी व शिक्षकांचा रंगला कृतज्ञता सोहळा…
अमित जाधव-संपादक
श्री समर्थ शाळेतील माजी विद्यार्थी व शिक्षकांचा रंगला कृतज्ञता सोहळा…
मुंबई-गणेश हिरवे
जोगेश्वरीतील बांद्रेकर वाडी येथील श्री समर्थ विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा कृतज्ञता सोहळा (१९८२ बॅच ते २०२१ बॅच) नुकताच १० एप्रिल २०२२ रोजी मोठ्या उत्साहात शाळेतच साजरा करण्यात आला. सेवा निवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार व विद्यार्थी-शिक्षकांचे स्नेहसंमेलन असे ह्या कार्यक्रमाचे स्वरूप होते.
ह्या कार्यक्रमाची सुरुवात शाळेची घंटा वाजवून व त्यानंतर होणाऱ्या दैनंदिन प्रार्थनेने झाली. सर्व माजी विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत आल्याचा अनुभव देणारा, अंगावर रोमांच उभे करणारा हा क्षण होता.
कृतज्ञता दिनाचे अध्यक्षस्थान शाळेचे संस्थापक व लोकप्रिय डॉक्टर
वळंजू यांनी भूषविले. अध्यक्षीय भाषणात त्यांनी शाळेच्या अगदी सुरुवातीच्या दिवसांची, त्या वेळेला घेतल्या गेलेल्या श्रमांचे पून:स्मरण केले. शाळेची वाटचाल दमदारपणे सुरू असून माजी विद्यार्थ्यांचे पाठबळ मिळाले कि ती अधिक जोरकसपणे होत राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच माजी विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस त्यांनी शुभाशीर्वादही दिले.
निवृत्त शिक्षकांच्या वतीने श्री इनामदार सर, श्री नरसिंगे सर. सौ धावडे मॅडम, श्री यादव सर इत्यादींनी आपली मनोगत व्यक्त करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. शाळेत मराठी विषय शिकविणारे श्री इनामदार सर यांनी खेळीमेळीच्या शब्दात भाषणाची सुरवात केली. योग्य ठिकाणी चिमटे काढत त्यांनी माजी विद्यार्थ्यांप्रमाणेच मी सुद्धा शाळेप्रती कृतज्ञ आहे असे नमूद करून पंढरपूरला जसे वारकरी दरवर्षी वारीला जातात तसे हे माजी विद्यार्थी पुन्हा पुन्हा शाळेत यावेत आणि त्यांनी निर्माण केलेल्या मळवाटेने आणखी विद्यार्थी शाळेत परत यावेत असे मत व्यक्त केले.
मुलांना न कळत्या वयात स्वतःचे बरे-वाईट समजण्याची तितकीशी जाणीव नसते. अश्या वेळेला त्यांना शिक्षकांचा धाक असावाच लागतो व मुद्दाम छडी उगारण्यापेक्षा सकारण बसलेला ओरडा मुलांना पथभ्रष्ट होऊ देत नाही असे मत नरसिंगे सर यांनी मांडले. त्यांच्या भाषणात भावनेचा ओलावा ओतप्रोत भरला होता. त्यांनीही सद्गदित होत पुन्हा शाळेत येण्याची संधी दिल्याबद्दल माजी विद्यार्थ्यांचे आभार मानले.
धावडे मॅडम यांनी त्यांच्या नेहमीच्या अत्यंत संयमित शैलीत माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी माजी विद्यार्थ्यांना आशीर्वाद दिले.
उपस्थित माजी विद्यार्थ्यांची मने तेव्हा थरारली जेव्हा हिंदी शिकविणाऱ्या यादव सरांनी त्यांच्या बुलंद आवाजात बोलण्यास सुरुवात केली. शाळेचा वर्ग सुरु होताना ज्या आवाजात ते बोलायचे तोच अगदी तसाच खणखणीत आवाज पुन्हा एकदा ३०-४० वर्षीनी सर्वांच्या कानावर पडला व सर्वांच्या अंगावर काटा आला. आणि बघता बघता यादव सरांनी त्यावेळेच्या अशा काही घटना व प्रसंग संगितले की काहीवेळ आम्ही लहान होऊन गेलो.आज शाळेतील अनेक विधार्थी मोठमोठ्या हुद्यांवर कार्यरत असल्याचे पाहून आम्हा सर्वांनाच आनंद व समाधान असल्याचे सांगितले.सोहळ्यासाठी आज साधारण २५०-३०० विधार्थी व ३५-४० सेवानिवृत्त शिक्षक वृंद वेळातवेळ काढून उपस्थित होते.
काही निवडक माजी विद्यार्थ्यांना सुद्धा आपल्या शाळेतील आठवणी सांगताना खास करून डॉ संगीता तानवडे व पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असणारी नीलिमा जाधव या दोघींचा आवाज मृदू होऊन त्यांना अश्रू आवरणे कठीण झाले.
यानंतर सेवानिवृत्त शिक्षकांना शाल व आठवण भेट म्हणून सन्मानचिन्ह देऊन विद्यार्थ्यांनी स्वतः त्यांना व्यासपीठावर नेऊन त्यांचा सन्मान करत आज आम्ही कितीही मोठे झालो असलो तरी आमच्या शिक्षकांनी आमच्यासाठी घेतलेली मेहनत आम्ही कधीच विसरू शकत नाही असे म्हणत त्यांचे आशीर्वाद घेतले. जे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, संस्थेचे पदाधिकारी यांचे देहावसान झाले अशा सर्वाना दोन मिनिटं स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच माजी विद्यार्थ्यांपैकी ज्यांनी कोरोना काळात पुढाकार घेऊन सामाजिक कार्य केले अशा विद्यार्थ्यांचा सुद्धा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी विद्यार्थ्यानी शाळेला सहकार्य म्हणून एक लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.तसेच शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही आपापल्या परीने कटिबद्ध राहू असे आवर्जून सांगितले.
कार्यक्रमास शाळेचे विश्वस्त मंडळ आशीर्वाद देण्यास हजर होते. त्यात प्रामुख्याने श्री. पाटकर, श्री. तावडे, श्री. नलावडे, श्री. सावंत, श्री. कुंदर, श्री. भट, श्री. खराडे, श्री साळवी, श्री. यतिश कदम, श्री. देसाई, श्री हिरवे गुरुजी हे आपुलकीने उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक श्री पोर्लेकर सर यांच्या सक्रिय पाठिंब्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना शाळेला माजी विद्यार्थी शाळेला केवळ आर्थिक मदतच नाही वेगवेगळ्या प्रकारे कशी मदत करू शकतात हे उदाहरण देऊन स्पष्ट केले.
या सर्व कार्यक्रमासाठी विवेक प्रभुकेळुस्कर, दीपक सावंत, सुहास तांबे, दक्षा वाकचौरे, संजय आंबेरकर या माजी विद्यार्थ्यांनाही पुढाकार घेतला तर त्यांना विश्वास गोळे, रमेश बांबरकर, विक्रांत बळकटे, ज्ञानेश्वर परब, मंगेश पवार, सूर्यकांत सालम, प्रथमेश रसाळ, शिल्पा बारटक्के, रेश्मा मेस्त्री, जागृती वैद्य, उदय पांचाळ, राजश्री येवले, केदार माणगावकर, सचिन आरोटे, अंजली सावंत, सचिन शिंदे, प्रशांत खांबे, विजय साळुंखे, दिनेश वाघवनकर, आशा जाधव, रश्मी गुरव, गणेश घोसाळकर, विजय जंगम, अजित भोगले, सुनील जाधव या विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेतली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन नितीन म्हसकर आणि सुचित्रा मानकामे ह्या माजी विद्यार्थ्यांनी केले. शेवटी सर्वानी एकसुरात वंदेमातरम गाऊन या सोहळ्याची सांगता करण्यात आली.