- *⭕️ठाणे शहरातील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई.*
ठाणे (१ फेब्रु, संतोष पडवळ ): महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईची धडक मोहिम सुरुच असून आज दिवा परिसरातील ५ अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
या कारवाईत श्री. हयात यांचे दुसऱ्या मजल्यावरील अंदाजे २५०० चौ. फुट मोजमापाचे कॉलम, ट्रिगल इमारतीच्या बाजुला असलेले अनधिकृत बांधकामधारक यांचे तिसऱ्या माळयावरील अंदाजे २५०० चौ.फुट मोजमाप असलेले बांधकाम, श्री.रशिद खान यांचे अंदाजे ३००० चौ.फुट मोजमाप असलेले प्लिंथचे बांधकाम, श्री. इम्रान शेख यांचे अंदाजे ४००० चौ फुट मोजमाप असलेले ४ था व ५ व्या माळयावरील कॉलम निष्कासित करण्यात आले. तसेच श्री. इनाम यांच्या ४ थ्या माळयावरील अव्याप्त १ रुम व पाचव्या मजल्यावरील कॉलम, श्री . युसुफ खान यांचे अंदाजे ७० x ५० चो.फुट मोजमापाचे ट्रिगल इमारतीचे मागचे प्लिंथ, जियाऊल रहमान यांचे दुसऱ्या माळयावरील अंदाजे ४००० चौ फुट मोजमापाचे अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. तर श्री.आलम भाई यांचे प्लिथचे अंदाजे ३००० चौ. फुट मोजमापाचे अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले.
सदर कारवाई १ पोकलेन, ३ गॅसकटर, १ ट्रेलर, ८० कामगार, १३ पोलीस, ६ जीप, ३ जेसीबी व ४ टेम्पो आदी यंत्रसामुग्री व कामगारांच्या सहा्य्याने करण्यात आली.
सदरची कारवाई अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त अशोक बुरपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून सदर कारवाई दरम्यान दिवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त अलका खैरे, मुंब्रा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त सागर साळुंखे, कळवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त समीर जाधव व अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त फारुख शेख व अतिक्रमण विभागाकडील अधिकारी व कर्मचारी व पोलीस विभागाकडील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


