आता पुण्यासाठी मुबई व ठाण्यातून शिवाई बस धावणार,96 वातानुकूलित विजेवर चालणाऱ्या बसेस लवकरच सेवेत….
अमित जाधव -संपादक
एसटी महामंडळाने विजेवर धावणारी पहिली ‘शिवाई’ वातानुकूलित बस पुणे – अहमदनगर मार्गावर सुरू केली असून आता येत्या ऑक्टोबरपासून पुण्यासाठी मुंबई, ठाण्यातून टप्प्याटप्प्याने ‘शिवाई’ची सेवा सुरू करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. या मार्गावर ९६ ‘शिवाई’ बस धावतील, अशी माहिती एसटी महामंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
प्रदुषणुक्त प्रवास, इंधनावरील खर्च कमी करण्यासाठी एसटी महामंडळाने विजेवरील वातानुकूलित ‘शिवाई’ बस सेव सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. महामंडळाच्या ताफ्यात टप्प्याटप्याने वातानुकूलित १५० बस दाखल होणार असून पहिल्या टप्यात ५० बस आणि दुसऱ्या टप्प्यात १०० बस दाखल होतील. ५० पैकी दोन बस पुणे – अहमदनगर – पुणे मार्गावर धावत आहेत. पुणे-नाशिक-पुणे, पुणे-औरंगाबाद-पुणे, पुणे-कोल्हापूर-पुणे आणि पुणे-सोलापूर-पुणे मार्गावर या बस प्रवाशांच्या सेवेत येतील. पहिल्या टप्प्यात येत्या जुलैअखेरीस १७ बस, दुसऱ्या टप्प्यात ऑक्टोबरपासून १७ आणि जानेवारी २०२३ पासून १६ बस सेवेत दाखल होतील.एसटीच्या ताफ्यात आणखी १०० ‘शिवाई’ बस दाखल होणार आहेत. यापैकी ९६ बसचे मार्ग आणि तारीखही निश्चित करण्यात आली आहे. मुंबई, ठाण्यातून पुणे रेल्वे स्थानक, स्वारगेटसाठी येत्या ऑक्टोबरपासून टप्प्याटप्याने ‘शिवाई’ बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. दादर-पुणे रेल्वे स्थानक व्हाया चिंचवड, परेल-स्वारगेट, ठाणे-स्वारगेट, बोरिवली-स्वारगेट असे मार्ग निश्चित करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पहिल्या टप्प्यात ९६ पैकी ऑक्टोबरपासून ३०, जानेवारी २०२३ पासून ४० आणि एप्रिल २०२३ पासून २६ ‘शिवाई’ बस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत.
९६ शिवाई बसचे मार्ग असे असतील
दादर ते पुणे रेल्वे स्थानक व्हाया चिचंवड – २४ बस
परेल-स्वारगेट – २४ बस
ठाणे-स्वारगेट – २४ बस
बोरिवली-स्वारगेट -२४ बस