जेव्हां प्रत्येकाचे पाय ग्रंथालयाकडे वळतील, तेंव्हा भारताला महासत्ता होण्या पासून कोणीच रोखू शकणार नाही!” – डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
अमित जाधव संपादक
14 एप्रिल 1891 ते 06 डिसेंबर 1956 हा डॉ. भीमराव रामजी आंबेडकर साहेब यांचा जिवन प्रवास. ज्ञानाची भूक असणारा आणि शांतीचा मार्ग शोधणारा बौद्धिसत्व!वर्गाच्या बाहेर राहून शिकून ही,ज्यांनी लोकशाहीचा अनमोल ग्रंथ लिहीला ते संविधान निर्माते!
आपल्या लाडक्या बाळाच्या मृत्युला बाजूला ठेऊन, समाजाच्या सेवेसाठी, रात्रंदिवस हातात ग्रंथ ठेऊन, पारायण करणारे एकलव्य. हिंदूकोड बिलासाठी मंत्री पदाला लाथ मारणारे एकमेव देशाभिमानी नररत्न!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विशिष्ट समाजाला नजरेसमोर ठेऊन घटना लिहीली नाही? तर सर्व जाती, धर्मांचा आर्थिक,सामाजिक,भौगोलिकदृष्ट्या सखोल अभ्यास करुन, प्रांतानुसार न्याय देण्याचा प्रयत्न केला. पुढील शेकडो वर्षांचा जीवनपट नजरेसमोर ठेऊन, बारीक सारीक गोष्टींचा अभ्यास करून, घटना लिहिणे हे सोपे नव्हते. त्यासाठी कैक संदर्भ,शेकडो ग्रंथ , अनेक विद्वानांशी बाबासाहेबांनी विचारविनिमय केला असेलच ना?
डॉ. बाबासाहेबांच्या घटनेत शिवाजी महाराजांचे स्वराज्य आढळते. छत्रपती शाहू महाराजांच्या आरक्षणाची क्षितिजे दिसतात. बाबासाहेबांच्या घटनेत या देशातील बुद्धांची प्रज्ञा, शिल्, करुणा या त्रि सुत्री आढळतात.सम्राट अशोकांचे परिवर्तनाचे विकास चक्र फिरताना दिसते.संतांची शिकवण आढळते.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे एक वाक्य सदा आठवते, घटना राबविणारेच जर योग्य नसतील, तर अशा घटनेचा काहीच उपयोग होणार नाही! सध्या देशात तिच परीस्थिती निर्माण झाली आहे. त्यावेळी असे वाटते की, असेच पुन्हा एक डॉ.बाबासाहेब आंबेडकर या धरतीवर जन्मास यावेत.देश जाती धर्माच्या चिखलात पुन्हा बरबटला जात आहे. डॉ.बाबासाहेब अजुन एक वर्ष या देशात राहीले असते तर, अजून एक सुवर्ण ईतिहास लिहीला गेला असता.बाबासाहेब अर्ध्यावर या देशाला,या समाजाला प्रगतीचे युग येण्या अगोदरच सोडून गेले.चंदनाचा सुगंध देऊन गेले. कोटी कोटी दिनांच्या काळजातील हंस हरपला आणि 06 डिसेंबर 1956 साली या देशाचा सूर्य अस्ताला गेला!
” प्रगतीचे ते युगे दिनांचे, गुपित मागे सारली!
दुष्ट काळाने भिमरायांची, प्राणज्योत ही चोरली!!”
अशा सुर्यपुत्राला महापरिनिर्वाणदिनी विनम्र अभिवादन!
शब्दांकन:- मोहीते भरत, दिवा (पूर्व) ठाणे.