अनंत पार्क या बेकायदा इमारतीची उभारणी प्रकरण, जमीन मालकासह बांधकाम व्यावसायिकांवर मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…
अमित जाधव - संपादक

ठाणे : दिवा परिसरातील ५४ बेकायदा इमारती पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने काही दिवसांपुर्वी दिल्यानंतर उशीरा का होईना ठाणे महापालिका प्रशासनाने आता कारवाईसाठी कठोर पाऊले उचलली आहेत. त्याचाच एक भाग रहिवाशांना नोटीसा पाठविण्याबरोबरच आता जमीन मालकासह बेकायदा इमारत उभारणाऱ्यांविरोधात एमआरटीपी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यास सूरूवात केली आहे. अनंत पार्क या बेकायदा इमारतीची उभारणी केल्याप्रकरणी जमीन मालकासह बांधकाम व्यावसायिकांवर मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे उर्वरित बांधकामांवर गुन्हा दाखल करण्याची तयारी पालिकेकडून सुरू आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी बेकायदा बांधकामांविरोधात कठोर कारवाईची तयारी सुरू केली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व प्रभाग समिती क्षेत्रात ७६९ बेकायदा बांधकामे असून त्यापैकी ६६३ बांधकामांची नोंद प्रभाग समितींच्या बीट निरीक्षकांनी बीट नोंदवहीत केल्याचे सांगत ती तोडण्याचे आदेश आयुक्त सौरभ राव यांनी नुकतेच दिले आहेत. तसेच या बांधकामांप्रकरणी त्यांनी सहाय्यक आयुक्तांना नोटीसा बजावण्यास सुरूवात केली असून दिवा, मुंब्रा आणि कळवा या तीन प्रभाग समिती सहाय्यक आयुक्तांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. त्या पाठोपाठ आता अनंत पार्क सोसायटी प्रकरण जमीन मालकासह बेकायदा इमारत उभारणारे एमआरटीपी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले आहे.