कुर्ला इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू,१७ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश….
अमित जाधव -संपादक
कुर्ला पुर्वेकडील एसटी बस डेपोच्या जवळील नाईक नगर सोसायटीयेथील चार मजली इमारत सोमवारी रात्री ११. ३० च्या दरम्यान कोसळली (Mumbai Kurla Building Collapse). यावेळी इमारतीत २०ते २५ रहिवाशी होते. ही दुर्घटना लेव्हल-३ची असून घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्याला सुरुवात केली. इमारत कोसळल्यानंतर ढिगाऱ्याखाली २०-२५ लोक अडकले होते. त्यापैकी आत्तापर्यंत १६ ते १७ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. तर, दुर्घटनेत २ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बचावकार्य अद्याप सुरू आहे.जखमींना उपचारांसाठी राजावाडी व सायन रुग्णालयात दाखल केलं आहे. राजावाडी रुग्णालयात १० जणांना दाखल केले होते. त्यातील ९ जणांना उपचारांनंतर घरी सोडण्यात आलं आहे. तर, एकावर अद्याप उपचार सुरू आहेत.
दरम्यान, नाईक नगर सोसायटीतील इमारतींना मुंबई महानगरपालिकेकडून नोटीस देण्यात आली होती. मात्र, तरीही तिथे लोक राहत होते. जवळपास ८ ते १० कुटुंब तिथे राहत होती. वास्तव्य करणारे रहिवासी हे सर्व भाडेकरु होते. मुंबई महापालिकेने नोटीस बजावलेल्या इमारतींमध्ये वास्तव्य करू नये असे आवाहन करण्यात येत आहे.