मान्यता न मिळालेल्या शाळांच्या विद्यार्थी आणि पालकांचा उद्या दिवा शहरात मेळावा..
अमित जाधव - संपादक

दिवा शहरात अनधिकृत शाळांचा विषय चांगलाच चर्चेला आला असून काही मान्यता प्राप्त शाळा आणि काही राजकीय पक्षांनी अनधिकृत शाळा बंद कराव्यात यासाठी कंबर कसली आहे. अनधिक शाळा तत्काळ बंद नाही केल्यास,दिवा शहरातील सर्व अधिकृत शाळांनी जुलै पासून सर्व शाळा बेमुदत बंद पुकारला आहे. अधिकृत शाळांच्या संचालक शिष्टमंडळाने भाजप आमदार संजय केळकरांनी नुकतीच भेट घेतल्यावेळी आमदारांनी या शाळांचा पाणी पुरवठा आणि वीज खंडित करावी आणि सर्व संचालकांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी पोलिस आयुक्तांकडे केली आहे. याशिवाय एका राजकीय पक्षाने न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान होत असल्यामुळे दिवा शहरातील अशा सर्व शाळा ताबडतोब बंद करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी म्हणून शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. मान्यता नसलेल्या शाळांच्या संचालकांनी उद्या शनिवार दिनाक २८ जून रोजी सकाळी ११ वाजता आकांक्षा हॉल दिवा पूर्व येथे मेळावा आयोजित केला आहे.
ठाणे महानगर पालिकेने पालिका क्षेत्रातील सर्व अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे, यामध्ये दिव्यासाहीत ठाणे महानगर पालिका क्षेत्रातील ८२ शाळांचा या यादीमध्ये समावेश आहे. एकट्या दिवा शहरातील अनाधिकृत शाळांचा विचार केल्यास या शाळांमध्ये आजघडीला २० हजार पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि १२०० शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी काम करत आहेत. मागील दोन वर्षापासून नवीन शाळांच्या मान्यतेची ऑनलाईन प्रक्रिया बंद असल्यामुळे तसेच दिवा शहरात ओसी आणि सीसी घेताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी यामुळे मान्यता प्राप्त करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. दिवा शहराची भौगोलिक परिस्थिती बघता व सी.आर.झेड च्या जाचक अटींचा विचार करता येथे अधिकृत शाळा बांधणं हे तांत्रिक दृष्ट्या तरी शक्य नाही. अशातच दिवा शहरात राहण्यासाठी आलेल्या सर्वसामान्य नागरिकांना परवडतील अशा शाळा दिवा शहरात मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या आहेत. अशा शाळांना मान्यता नसल्यामुळे या शाळा बंद कराव्यात अशी मागणी दिवा शहरातीलच काही मान्यता प्राप्त शाळा संचालकांनी व राजकीय पक्षांनी केली असल्यामुळे दिवा शहरातील २० हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागले आहे. यामुळे सर्व पालक वर्गामध्ये चिंतेचं वातावरण तयार झालं असून आपल्या पाल्याचं शैक्षणिक नुकसान तर होणार नाही ना? या चिंतेने पालक शाळांमध्ये खेटा मारत आहेत. अशा सर्व पालकांचा उद्या सकाळी ११ वाजता, आकांक्षा हॉल दिवा पूर्व येथे आयोजित करण्यात आला आहे. सदर मेळाव्याला शिवसेना शहरप्रमुख रमाकांत मढवी मार्गदर्शन करणार असल्याचे शाळा संचालकांनी सांगितले.