ठाणे पूर्व सॅटिस प्रकल्पातील बाधित घरे व दुकाने निष्कासित,दिवा प्रभाग समितीतील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई सुरूच….
अमित जाधव-संपादक
ठाणे पूर्व सॅटिस प्रकल्पातील बाधित घरे व दुकाने निष्कासित.
दिवा प्रभाग समितीतील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई सुरू
ठाणे (१३ एप्रिल, संतोष पडवळ ): ठाणे महानगरपालिकेच्याठाणे स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या ठाणे पूर्व सॅटिस प्रकल्पातील बाधित बांधकामे तात्काळ निष्कासित करण्याचे आदेश पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे व महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी दिल्यानंतर ठाणे स्टेशन जवळील ६ घरे व ५ दुकाने व मंगला हायस्कूल जवळील घरे रिक्त करून त्यावर निष्कासानाची कारवाई करण्यात आली.
ठाणे महानगरपालिकेच्या ठाणे स्मार्ट सिटी अंतर्गत कोपरी परिसरात सुरू असलेल्या सॅटिस प्रकल्प कामामध्ये काही निवासी घरे व दुकाने यामुळे कामास विलंब होत आहे. या प्रकल्पात होणाऱ्या बाधित होणाऱ्या नागरिकांचे तातडीने पुनवर्सन करुन हे काम अधिक गतीने करण्याचे आदेश पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनीपाहणी दौऱ्यावेळी दिले होते. त्यानुसार सर्व बाधित बांधकामे निष्कासित करून नागरिकांचे पुनवर्सन करण्यात आले आहे.
दरम्यान ठाणे महापालिकेच्यावतीने शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईची मोहिम सुरु असून आज दिवा प्रभाग समितीमधील वाढीव अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आलीत.
या कारवाईतंर्गत दिवा प्रभाग समिती येथील मोहसीन खान,फडके पाडा तलावा मागे, खार्डी तळ मजल्याचे अंदाजे २८०० चौ फूट बांधकाम जेसीबीच्या साहाय्याने व कामगाराच्या मदतीने निष्कासित करण्यात आले. तसेच आतिफ खान यांचे शिबली नगर,शीळ येथील तळ व्याप्त पहिल्या मजल्यावरील अंदाजे ३० × १५ चौ.फूट बांधकाम गॅस कटरच्या मदतीने निष्कासित करण्यात आले. तसेच कळवा प्रभाग समिती अंतर्गत विटावा येथील खार जमीनीवरील अनधिकृत चाळीचे बांधकाम तोडण्यात आले.
सदर कोपरी प्रभाग समितीमधील कारवाई उप आयुक्त मनिष जोशी व उप आयुक्त शंकर पाटोळे यांनी तर दिवा प्रभाग समितीमधील कारवाई अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाचे उप आयुक्त जी.जी. गोदेपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त (सनियंत्रण व समन्वय) महेश आहेर यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या साहाय्याने केली.


