तरुणीचे हात-पाय तोडून गोणीत भरला मृतदेह; वरळी सी-फेसवर दिला फेकून, पोलीस घटनास्थळी दाखल…
अमित जाधव - संपादक
मुंबई – मुंबईत एका अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ माजली आहे. वरळी सी फेस येथे गोणीत भरुन हा मृतदेह फेकून देण्यात आला होता. मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून, तरुणीची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरु आहे. तसंच अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरळीत एका तरुणीचा मृतदेह आढळला असून तो गोणीत भरलेला होता. आम्हाला याची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी दाखल झालो होतो. यानंतर आम्ही मृतदेह ताब्यात घेतला. यावेळी पाहणी केली असता तरुणीचे हात आणि पाय मोडले असल्याचं आमच्या लक्षात आलं. आम्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. याप्रकरणी आम्ही अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सध्या सुरु असून तरुणीचीही ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरु आहे.
मुंबईत तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्न
गेल्या महिन्याभरात मुंबई लोकलमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तीन घटना समोर आल्या आहेत. धावत्या लोकलमध्ये एका तरुणाने 24 वर्षीय तरुणीची छेड काढण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला. तरुणीच्या तक्रारीनुसार मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
मालाड येथे राहणारी एक तरुणी कामानिमित्त चर्नी रोड येथे लोकलने जात होती. त्याचवेळी ग्रँड रोड स्थानकादरम्यान एका तरुणाने तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरुणीने आरडाओरडा केला असता त्याने तिथून पळ काढला.
ट्रेनमध्ये लैंगिक अत्याचार
14 जून रोजी हार्बर मार्गावरील मस्जिद बंदर आणि सीएसएमटी स्थानकादरम्यान एका तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. पीडित मुलगी गिरगाव येथील रहिवाशी असून नवी मुंबईतील बेलापूर येथे एका जात होती. सीएसएमटी-पनवेल लोकल ट्रेनमधून प्रवास करत असताना आरोपीदेखील ट्रेनमध्ये चढला. पीडित तरुणी एकटी असल्याचा फायदा घेऊन त्यांने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तरुणीने आरडाओरडा सुरु केल्यानंतर आरोपीने मस्जिद बंदर स्थानकावरुन पळ काढला.



