दिवा शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत, नागरिकांनवर हल्ले करण्याचे प्रमाण वाढले..
अमित जाधव - संपादक

दिवा शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून अनेक सोसायटीमध्ये व परिसरात कुत्रे चावल्याच्या घटना घडत आहेत. आगसन येथील ए एन डी या उच्च भ्रू सोसायटीत आणि दिवा शहरातील विकास म्हात्रे गेट येथे काही दिवसापूर्वी दोन जणांवर कुत्र्यांनी हल्ला केला आहे. बी आर नगर, मुंब्रादेवी कॉलनी, श्लोक नगर, सदाशिव दळवी नगर, सद्गुगुरू नगर, शीळ फाटा, सुदामा सोसायटी आदी भागात कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दिवा शहर आणि परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नागरिक मोकळ्या जागेत कचरा आणि शिळे अन्न टाकत आहेत. अशा ठिकाणी भटक्या कुत्र्यांच्या वावर वाढला आहे. हे कुत्रे पकडण्यासाठी महापालिकेचे श्वान पथक आहे.मात्र, या पथकाला कुत्रे सापडत नाही. श्वान पथकांची गाडी पाहून कुत्रे पसार होतात. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार वर्षाला जवळपास हजाररो नागरिकांना भटके कुत्रे चावा घेतात.
महापालिकेने वर्षात सात ते आठ हजार कुर्त्यांवर शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र, कुत्र्यांवर शस्त्रक्रिया केल्यांनतरदेखील त्यांची संख्या वाढत असल्याचा विरोधाभास दिसून येत आहे. चौकांमध्ये भटक्या कुत्र्यांनी ठिय्या मारल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. हे कुत्रे गाड्यांच्या मागे लागतात.
दुचाकीस्वरांच्या अंगावर धावून जातात. तसेच रात्री रस्त्यावरून जाणार्या नागरिकांनादेखील हे कुत्रे त्रास देतात. बैठ्या घरांच्या वस्त्यामध्ये लहान मुलांवर हे कुत्रे हल्ला करीत असल्याचे काही ज्येष्ठ नागरिकांनी व समाजसेवकांनी यावेळी बोलताना सांगितले.