एवढ्यात चार आजीबाईंचा घोळका साहेबांच्या काचेजवळ येऊन थांबला. 70-75 वर्षाच्या असतील त्या साऱ्या..! त्यांना आलेले पाहून निघालेली गाडी थांबवत खासदार साहेब खाली उतरले..
अमित जाधव - संपादक
दुपारची वेळ होती. नंदनवन निवासस्थानी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांची एक महत्वपूर्ण बैठक सुरु होती. बैठक कक्षाबाहेर वेगवेगळे प्रश्न घेऊन साहेबांना भेटण्यासाठी लोकांची नेहमीसारखी भरगच्च गर्दी झाली होती. महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेली ही गर्दी.! या सरकारमध्ये आपल्याला नक्की न्याय मिळेल ही दृढ अपेक्षा घेऊन भेटायला आलेले हे सगळे साहेबांच्या प्रतीक्षेत होते. बैठक संपली आणि साहेब बाहेर आले. त्यांच्या भोवती भेटणाऱ्यांचा गराडा पडला. एक एक प्रश्न संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावून संपवत; साहेब दालनातून बाहेर पडले. मतदारसंघातील कार्यक्रमाला वेळेत पोहचायचे होते म्हणून घाई गडबडीत गाडीतही बसले.!
एवढ्यात चार आजीबाईंचा घोळका साहेबांच्या काचेजवळ येऊन थांबला. 70-75 वर्षाच्या असतील त्या साऱ्या..! त्यांना आलेले पाहून निघालेली गाडी थांबवत साहेब खाली उतरले..
” हा बोला आजी, कुठून आलात? काय प्रश्न आहे..? ”
” आम्ही ते लई लांबून आलो, चाकण वरून.. आधी वर्षा वर गेलो होतो, तिथून सांगितले इकडे आहात तुम्ही.. लेकरा, सगळीकडे फिरले पण काय काम होत नाही. तु काम करशील म्हणून आलो.” सुरकुतलेल्या डोळ्याच्या कडा ओल्या करत त्यातली एक धीट आजीबाई बोलली..!
” काय काम होते, ते तर सांगा आजी? मी लगेच करून देतो” साहेब आजीला धीर देत बोलले.
” ते माझ्या जमिनीचे…” म्हणत आजीने आपला विषय नेमकेपणे मांडला. जुन्या काळातील शिकलेली आजी होती ती. त्यामुळे ते कोर्टाचे दाखले वगैरे तिने दाखवले..
” ये लाव रे तो पुणे कलेक्टरांना फोन” असे आपल्या सचिवाला सांगत त्यांनी पुन्हा आजीबाईंशी बोलायला सुरवात केली..
” मी रोज तुमचाच ( मोठ्या साहेबांना उद्देशून) कार्यक्रम बघते. तुम्हाला tv वर बघत असते. लई बरे वाटते. गुवाहाटीला गेले, मग आले हे सगळ मी पाहिलं. आमचे वाटता बघ तुम्ही. भेटता बघा सगळ्यांना.. आता आम्ही असे साधे तरीही भेटलात बघा..” आजीबाई आपल्या जोरकास आवाजात बोलत होती.
” बरोबर केले ना मग आम्ही हे सगळे, जे केले ते..” साहेबांनी विचारले..
” हो .. मग.. बराबर केले.” दोनीही हात वर करून मान हलवत आजीबाई म्हंटली..
” पण तुम्ही एवढ्या लांबून आल्या, तुम्हाला कसे कळले की साहेब भेटतील. एवढा आत्मविश्वास कसा आला की साहेब भेटणारच म्हणून..एवढ्या लांबून तुम्ही काहीही विचार न करता आलात..? कसे असे? ” साहेबांनी उत्कंठतेने विचारले..
“मग.. मी ऐकते की..पाहते की ‘वर्षा’ची दारे सगळ्यांसाठी खुले आहेत. तुम्हीच तर सांगता की सामान्य, गोर गरीबांना भेटतात साहेब.. तेच तर बघते मी tv वर..! बाकी काहीच पाहत नाही..”
साहेबांनी हसत आजीबाई ला हात जोडले.. सरकार करत असलेल्या अफाट कामाची ही पोचच आहे. सामान्यांच्या मनात निर्माण झालेला हा विश्वास आहे, अशी कृतकृत्य झाल्याची भावना साहेबांच्या मनात त्यावेळी नक्कीच निर्माण झाली होती. आजूबाजूला असलेले आम्ही सगळे देखील या संवादाने भारावलो होतो.
“विरोधक काय बोलतात, अजून कोण काय बोलतात, कोण काय बोलते.. काही नाही, ते सोडून दे.. तुम्ही चांगले आहात.. आम्हाला अभिमान आहे शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झालाय.. अगदी आमच्या घरातला..! ‘बळी’च राज्य आलंय बघ..! ” आजी आपलेपणाने बोलत होती.
तोवर जिल्हाधिकारी यांना फोन लागला होता. फोन हातात घेत साहेबांनी आजीच्या प्रश्नाबाबत सूचना दिल्या. त्या प्रश्नावर तात्काळ लक्ष घालून तो सोडविण्याबाबत चर्चा केली.
” जा आजी, तुमचे काम झाले. बोललो कलेक्टर यांच्याशी.. ते करतील सगळी मदत”
” कोणीच हे केले नाही बघ जे आज तू केले..! मनाला समाधान मिळालं. एक फोटो काढते बघ आता तुझ्या सोबत..” आजीच्या डोळ्यात पाणी होत.. पण आधी होत ते नाही.. आता होत ते आनंदाच..!
साहेबांच्या खांद्यावर हात टाकून आजीने फोटो काढला; आजीबाईला नमस्कार करत; तिला जेवू घालून मग व्यवस्थित पाठवून देण्याच्या सूचना साहेबांनी दिल्या आणि साहेब गाडीत बसले..!
तशी म्हणाल तर ही एक साधी गोष्ट ..! पण तितकीच गर्भीत देखील..! या पेक्षा मोठा आशीर्वाद तो काय असेल..?



