
ठाणे ता ३ जुलै : दिवा रेल्वे स्थानक पूर्व पश्चिम जोडणारा रेल्वे उड्डाणपुल गेली सात वर्षांपासून रखडला आहे. परिणामी दिवा रेल्वे स्थानकातील रेल्वे फाटक कायम स्वरूपी बंद करण्यास अडचण निर्माण होत असून रेल्वे फाटकाचा रेल्वे वाहतुकीला पडत आहे. लोकल व मेले एक्सप्रेसचे वेळापत्रक कोलमडले जात आहे. स्थानिकांच्या जमीन मोबदला तसेच बाधित रहिवासी इमारतींचा निर्णय होत नसल्याने उड्डाणपूल प्रकल्प रखडल्याने करदात्यांच्या पैशांचा अपव्यय सुरू आहे.
२०१९ मध्ये सुमारे ३८ कोटी ९० लाख रुपयांचा दिवा रेल्वे उड्डाणपूल (आरओबी) प्रकल्प तब्बल ७० कोटी रुपयांवर गेला असूनही गेली सात वर्षे हा पूल रखडलेला आहे. दरम्यान, या प्रकल्पाचा खर्च दुपटीने वाढला आहे. प्रशासनाने निष्काळजीपणा केल्यामुळे दिवा रेल्वे उड्डाणपुलाचे काम रखडले असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा असून प्रवाशांचे प्रचंड हाल वाढले आहेत. या गोंधळावर संतप्त झालेल्या प्रवासी संघटनांनी रेल्वे, एमआरव्हीसी, ठाणे महापालिका आणि सत्ताधाऱ्यांवर कडक शब्दांत निशाणा साधला आहे. ‘विकासाच्या नावाखाली जमीन लुटायची आणि खर्च फुगवायचा हीच यंत्रणांची रणनीती आहे काय, असा सवाल करीत या संघटनांनी दोषी अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याची आणि शासनाने जबाबदारी स्वीकारण्याची मागणी केली आहे. २०१९ मध्ये या दिवा रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाला वर्क ऑर्डर मिळाली. त्या वेळी १८ महिन्यांत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते मात्र जमीन संपादन, कायदेशीर अडथळे आणि स्थानिकांचा विरोध यांचा विचार न करता प्रकल्प रेटण्यात आला. यामुळे काम लांबणीवर पडले गेले. परिणामी महागाईमुळे खर्च दुपटीने वाढला. रेल्वे प्रशासनाचा निर्णय घेण्यातला ढिसाळपणा, समन्वयाचा अभाव आणि जबाबदारीपासून दूर पळणाऱ्या एजन्सीमुळे सरकारी निधी वाया गेला असल्याचे स्पष्ट होत आहे.