कोकणवासीयांसाठी मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील आक्रमक, रेल्वे राज्यमंत्र्यांना खरमरीत पत्र,गणपती साठी कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे आरक्षण फुल्ल,दलालांचा सुळसुळाट..
अमित जाधव - संपादक
मुंबई, ठाणे परिसरातून गौरी गणपती निमित्त कोकणात मोठ्या प्रमाणावर भाविक आपल्या मूळ गावी जात असतात. यावर्षी गौरी गणपती निमित्त गावी जाणाऱ्या गाड्यांचे आरक्षण सुरू झाले, पण तिकीट आरक्षित करून सुरक्षित प्रवासाचे स्वप्न पाहणाऱ्या कोकणी माणसाचा भ्रमनिरास झाला आहे.
आरक्षण सुरू झाल्यानंतर पहिल्याच मिनिटाला सर्वच गाड्यांचे बुकिंग फुल्ल झाल्याचे मेसेज दिसायला लागले, इतकचं नव्हे तर वेटिंग तिकीट सुद्धा मिळत नाहीये अशी परिस्थिती दिसून येतेय. वास्तविक दरवर्षी अशीच परिस्थिती उद्भवत असताना, रेल्वे मंत्रालयातून यावर कोणताही तोडगा काढला जात नाही. दलालांच्या हातात आज सर्व आरक्षण असून परराज्यातून सर्रासपणे तिकिटे बुक होतात आणि हिच तिकिटे नंतर दलालांच्या मार्फत चढ्या भावाने कोकणी माणसाला विकली जातात. इतकी भयानक परिस्थिती असताना रेल्वे मंत्रालयाकडून साधी चौकशीही होत नसल्याने दलालांचे चांगलेच फावत असल्याचे आमदार राजू पाटील यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
तरी रेल्वे राज्य मंत्र्यांनी यात तातडीने लक्ष घालून सर्व गाड्यांच्या आरक्षणाचा आढावा घ्यावा तसेच नवीन गाड्यांचे नियोजन आत्ताच करून गौरीगणपती निमित्त जाणाऱ्या सर्व भाविकांना आरक्षित तिकीट मिळून प्रवास सुखकर होईल याची काळजी घ्यावी अशी मागणी त्यांनी आपल्या पत्रात केली आहे.