Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

अपना घर योजनेच्या माध्यमातून दोनशे नागरिकांची फसवणूक….

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 9

*अपना घर योजनेच्या माध्यमातून दोनशे नागरिकांची फसवणूक*

*बँकेने वेळोवेळीव पाच वर्षे गृहकर्जाच्या नावाखाली हफ्ते घेतले मात्र घरेच दिले नाहीत*

*फसवणूक झालेल्या नागरिकांनी पुढे यावे असे पोलिसांचे आवाहन…*

अपना घर उपक्रमाच्या नावाखाली वेगवेगळी वृत्तपत्रे आणि वाहिन्यांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर सम्यक निवास हक्क संस्थेच्या माध्यमातून गरीब आणि गरजू लोकांना स्वस्तामध्ये घरे दिली जात आहेत, अशी जाहिरात झळकली. नवी मुंबईतील एका निवृत्त वकिलाने ही जाहिरात पाहून संस्थेचे चेंबूर येथील कार्यालय गाठले. साडेतीनशे चौरस फुटाचे घर पनवेल येथे अवघ्या आठ लाख ५७ हजार रुपयांत देणार असल्याचे या कार्यालयात उपस्थित एका महिलेने सांगितले. या महिलेने वकिलांची ‘अपना घर’ योजनेचे संचालक रवी पांडियन यांच्याशी ओळख करून दिली. पनवेल कोलवाडी येथील एका रिकाम्या भूखंडावर निवासी संकुल बांधण्यात येत असल्याचे या वेळी पांडियन यांनी त्यांना सांगितले. घराची रक्कम पाच वर्षे सुलभ हप्त्यांमध्ये बँकेत भरायची आणि पाच वर्षांनंतर घराचा ताबा दिला जाईल, अशी योजना असल्याचे त्यांनी सांगितले. स्वस्तात घर मिळत असल्याने निवृत्त वकिलाने पैसे भरण्याची तयारी दर्शवली. सन २०१३पासून २०१८पर्यंत पाच वर्षांत गृहकर्जाचे ६० हप्ते भरल्यानंतर वकिलाने घराच्या ताब्याबाबत विचारणा केली. तेव्हा स्टॅम्पड्युटी आणि नोंदणी, तसेच इतर फीच्या नावाखाली त्यांच्याकडून आणखी तीन लाख रुपये घेण्यात आले. यानंतरही घराचा ताबा देण्यासाठी चालढकल केली जाऊ लागली.संस्थेच्या चेंबूर येथील कार्यालयात वारंवार जात असल्याने या वकिलाची गुंतवणूक केलेल्या अन्य लोकांशी ओळख झाली. आपल्याबरोबरच इतर लोकांचीही फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सुमारे ३० ते ३५ जणांनी पोलिसांत धाव घेतली. वकिलाच्या तक्रारीवरून आरसीएफ पोलिसांनी फसवणूक, महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, १९९९ तसेच इतर कलमांन्वये गुन्हा दाखल करून पांडियन आणि राठोड या दोघांना अटक केली. पांडियनविरुद्ध वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत फसवणूक, बनावट कागदपत्रे बनविणे, मारामारी, दंगलीचे २० गुन्हे दाखल आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे