दिवा परिसरातील आरओबी, रस्ता दुरुस्ती, गटर्स व पाईपलाईन कामाची महापालिका आयुक्तांनी केली पाहणी,दिव्यातील कामे तातडीने वेळेत पूर्ण करण्याचे दिले निर्देश…
अमित जाधव-संपादक
दिवा परिसरातील आरओबी, रस्ता दुरुस्ती, गटर्स व पाईपलाईन कामाची महापालिका आयुक्तांनी केली पाहणी..
दिव्यातील कामे तातडीने वेळेत पूर्ण करण्याचे दिले निर्देश…
ठाणे : ठाणे महापालिकेच्या दिवा प्रभाग समितीमधील आरओबी, रस्ता दुरुस्ती, गटर्स, पाईपलाईन,स्वच्छता तसेच इतर कामांची आज महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी पाहणी करून या परिसरातील सर्व कामे तातडीने वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागास दिले.
या पाहणी दौऱ्यास माजी उप महापौर रमाकांत मढवी, माजी नगरसेवक शैलेश पाटील, दीपक जाधव,अमर पाटील, माजी नगरसेविका अंकिता पाटील, दीपाली भगत, अतिरिक्त आयुक्त(१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त(२)संजय हेरवाडे, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, उप आयुक्त मारुती खोडके, उप आयुक्त मनीष जोशी, उप आयुक्त जी. जी. गोदेपुरे, संबंधित कार्यकारी अभियंता, उप अभियंता तसेच इतर महापालिका अधिकारी आदी उपस्थित होते.
यावेळी प्रस्तावित शिळ – दिवा रस्त्यामधील गळती थांबविणे, पाण्याची लाईन टाकणे, दिवा चौकात श्री ज्ञानेश्वर म्हात्रे यांची जागा अधिग्रहित करणेबाबत बैठक आयोजित करणे, दिवा आर.ओ.बी बांधकामामध्ये येणाऱ्या ओव्हरहेड विद्युत वाहिन्या स्थलांतरित करणे, दिवा आरओबीमध्ये बाधित होणाऱ्या बांधकाम निष्कासनाकरिता आवश्यक उपाययोजना करणे तसेच दिवा आरओबी व विविध ठिकाणी रेल्वे ट्रॅकचे खालून प्रस्तावित नळ जोडण्यासंबंधी विविध मुद्यांबाबत डी.आर.एम मध्यरेल्वे यांचे स्तरावर बैठक आयोजित करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
दिवा तलाव परिसरात स्थानिक मासे विक्रेत्यांना व्यवसायासाठी शेडची उभारणी करणे, दिवा ( प ) पाणी प्रश्न सोडविणेबाबत दिवा ( प ) भागात क्लस्टर योजना राबविणे, दिवा परिसरातील विहिरी स्वच्छ करुन पाणी पिण्यायोग्य करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ.शर्मा यांनी संबंधितांना दिले.
तसेच दिवा शीळ मल : निसारण प्रकल्प, धर्मवीरनगर परिसरातील टाटा पॉवर रस्त्यामधील अतिक्रमणे निष्कासित करणे, धर्मवीरनगर परिसरातील टाटा पॉवर रस्त्याचे कामकाज सुरु करणे, दातिवली तलावलगत नाल्याच्या मुखावर बांधण्यात आलेले शौचालय निष्कासित करणे, दिवा आगासन रस्त्यामधील डांबरीभाग आरसीसी करणे, बेडेकर कल्व्हर्ट ते श्री हॉटेल जल वाहिन्या टाकणे, दातिवली रेल्वे स्थानक करीता जोडरस्ता तयार करणे कामी जागा अधिग्रहित करणेकरीता जमीन मालकाशी चर्चा करणे, आगरी – कोळी भवनकडे जाणारा दातिवली उसर्ग डी.पी मिसमॅचचे निराकरण करुन रस्त्याचे काम सुरू करणे, दातिवली उसर्ग रस्त्यालगत रेल्वेमार्फत प्रस्तावित फ्रेट कॉरिडॉर पर्यंत पोहोचणेकरीता आवश्यक उपाययोजना करणेकामी रेल्वे विभागाशी समन्वय साधणे, रुण्वाल गृहसंकुल येथील एमेनिटी जागेत आगरी – कोळी भवन करीता जागेचे सपाटीकरण करणे आणि दातिवली तलावामध्ये आवश्यक गॅबाईन वॉलची निर्मिती करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.


