
ठाणे महापालिकेच्यावतीने दरवर्षी पावसाळ्यात मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात येते. ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन असे स्पर्धेचे नाव असते. महापौरांच्या अध्यक्षतेखाली ही स्पर्धा घेण्यात येते. ठाणे महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानेही ही राज्य पातळीवर स्पर्धा घेण्यात येते. त्यात राज्याच्या विविध जिल्हयातून १५ ते २० हजार धावपटू सहभागी होतात. देश व जागतिक पातळीवर धावपट्टू निर्माण करणे या उद्देशातून ही स्पर्धा घेण्यात येते. या स्पर्धेत शहरातील विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत असे सर्वजण मोठ्या संख्येने सहभागी होतात.
२१ ते ५ किमी अंतरपर्यंतची स्पर्धा असते. या स्पर्धेच्या माध्यमतून विविध सामाजिक संदेश दिले जातात. या स्पर्धेची धावपटू आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र, करोना संसर्गामुळे या स्पर्धा रद्द करण्यात आली. करोना काळानंतर जनजीवन पुर्वपदावर आले. यानंतर पालिकेची पंचवार्षिक मुदत संपुष्टात आली आणि पालिकेत प्रशासकीय राजवट लागू झाली. यामुळे गेल्या सहा वर्षांपासून ही स्पर्धा होऊ शकली नाही. दरम्यान, यंदाच्या वर्षांपासून ही स्पर्धा पुन्हा घेण्यासाठी पालिकेच्या क्रीडा विभागाने पाऊले उचलली आहेत. येत्या ऑगस्ट महिन्यात ही स्पर्धा घेण्याचे नियोजन क्रीडा विभागाकडून आखले जात आहे.
स्पर्धेच्या नावात बदल
ठाणे महापालिकेची पंचवार्षिक मुदत मार्च २०२२ मध्ये संपुष्टात आली आणि तेव्हापासून पालिकेत प्रशासकीय राजवट लागू झाली. ठाणे महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात येते. परंतु पालिकेत प्रशासकीय राजवट असल्याने या स्पर्धेचे नाव बदलण्यात येणार असून ठाणे महापालिका वर्षा मॅरेथॉन स्पर्धा या नावाने ही स्पर्धा घेण्यात येणार असल्याचे पालिका सुत्रांनी सांगितले.