बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

ठाणे महापालिका वर्धापन दिनी ठामपा कंत्राटी सफाई कामगार करणार अभिनव आंदोलन !….

अमित जाधव-संपादक

ठाणे दि. 25 सप्टेंबर
ठामपा शाळेत साफसफाईचे काम करणारे सुमारे १८० कामगारांना करोनाच्या काळात शाळा बंद पडल्याने १६ मार्च पासून ८ सप्टेंबर २०२१ या काळातील वेतन अदा करण्यात आले नाही. कामगारांनी स्वतःच्या मर्जीने गैरहजर राहिले नव्हते तर महापालिका प्रशासनानेच कामावर येण्यास मज्जाव केला होता. आता १ एप्रिल २०२१ पासून पुन्हा कामावर येण्यासाठी मनाई केली आहे. सुमारे ११ महिन्यांचे पगार न मिळाल्याने ठाणे महापालिकेच्या शाळांमधील १८० कंत्राटी सफाई कामगारांच्या कुटुंबातील सुमारे एक हजार लोकांची आर्थिक कुचंबणा होऊन उपासमार होत असल्याने येत्या महापालिकेच्या वर्धापन दिनापासून अभिनव आंदोलन करण्याचे कामगारांनी जाहीर केले आहे.
यात ८० टक्के महिला सफाई कामगार आहेत. त्यापैकी अनेक जण भाड्याचे घरात राहतात, रेशन व अन्य आवश्यक गरजांसाठी लोकांचे जगणं कठीण झाले आहे. ही बाब सुसंस्कृत ठाणे शहराला तसेच नावाजलेल्या ठाणे महापलिकेला शोभनीय आहे का ?
अशा सवाल करत सर्व कामगारांना काम द्या, उपासमार थांबवा, थकित वेतन फरकाची रक्कम अदा करा, महाराष्ट्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार करोना काळातील वेतन अदा करा, आदी मागण्यांचे निवेदन महापालिका आयुक्त डॉ विपिन शर्मा यांना दिले आहे.

करोना काळाचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्याचे कामगार आयुक्त यांनी दि. २० मार्च २०२० रोजी परिपत्रक काढून आदेश दिले होते की ” करोना काळात कोणत्याही कारणाने कामगारांना कामावरून कमी करता कामा नये, जर करोनाच्या निर्बंधामुळे कोणी कामगार कामावर हजर राहू शकत नसेल तर, त्याला कामावर हजर समजून वेतन अदा करण्याचे निर्देश ही सदर परिपत्रकात देण्यात आले आहे. गेल्या वर्षी ठामपा उप आयुक्त श्री मनिष जोशी यांनी करोना काळातील अर्धे (५०टक्के) वेतन अदा करण्याबाबत सहायक कामगार आयुक्त यांच्या दालनात मान्य केले होते. परंतु आजतागायत त्याची पूर्तता झाली नाही.
दि. २३ /०८ / २०२१ रोजी सदर सफाई कामगारांच्या शिष्टमंडळाने मा. अतिरिक्त आयुक्त -श्री संदीप माळवी यांची नौपाडा पोलिस ठाण्यातील अधिकार्यांच्या उपस्थितीत भेट घेतली असता, लवकरच प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर कामगारांनी अनेकदा भेटण्यासाठी प्रयत्न केले तर त्यांना भेट दिली जात नाही. अधिकारी चर्चा ही करत नसल्याने आता उपासी राहून मरण्यापेक्षा न्याय हक्कासाठी आंदोलन करणे हाच एकमेव पर्याय उरला असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. महापालिका आयुक्त डॉ विपिन शर्मा यांनी कामगारांना कामावर हजर करून घेण्यासाठी संबंधित अधिकार्याना आदेश देऊन आम्हाला न्याय द्यावे, असे आवाहन पिडीत कामगारांनी केले आहे।
ठाणे महापालिका प्रशासनाने करोना काळात पिडीत व गरजूंना मदतीचे हात पुढे केले होते. मात्र आपल्याच सफाई सेवकांना त्यांचे हक्काचे वेतन दिले नाही.किंवा त्यांना आर्थिक कुचंबणेतून बाहेर काढण्यासाठी करोना काळातील किमान ५० टक्के वेतन ही अदा केले नाही,
सदर कामगारांच्या किमान वेतनाच्या फरकाची थकीत रक्कम या बिकट परिस्थिती मध्ये अदा केली नाही. ही बाब कामगारांवर अन्याय करणारी निंदाजनक बाब असल्याचे श्रमिक जनता संघाचे सरचिटणीस जगदीश खैरालिया यांनी सांगितले. कामगारांच्या या लढाईत श्रमिक जनता संघ कामगारांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन ही श्री खैरालिया यांनी यावेळी कामगारांना दिले आहे.
श्रमिक जनता संघाच्या प्रयत्नाने कामगार उप आयुक्त, ठाणे यांच्या कार्यालयात २९ सप्टेंबर २०२१ रोजी संबंधित कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर सुनावणी आयोजित केली आहे. त्यावेळी ठामपा प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेऊन न्याय्य व सन्मानजनक तोडगा काढून
सामोपचारांने १८० कुटुंबाची उपासमार थांबवावी असे आवाहन ही जगदीश खैरालिया यांनी केले आहे.
महापालिका प्रशासनाने न्याय न दिल्यास नाईलाजाने येत्या ठाणे महापालिकेच्या वर्धापन दिनापासून कामगारांनी अभिनव आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे