ठाणे जिल्ह्यात 15 डिसेंबर 22 ते 25 जानेवारी 2023 या कालावधीत बालकांसाठी विशेष गोवर-रुबेला लसीकरण अभियान…
अमित जाधव - संपादक
ठाणे जिल्ह्यात 15 डिसेंबर 22 ते 25 जानेवारी 2023 या कालावधीत बालकांसाठी विशेष गोवर-रुबेला लसीकरण अभियान…
ठाणे जिल्ह्यात गोवर-रुबेलाचा उद्रेक नियंत्रीत करण्यासाठी भिवंडी, कल्याण, अंबरनाथ,मुरबाड व शहापुर या तालुक्यात तसेच अंबरनाथ व बदलापूर नगरपालिका कार्यक्षेत्रात दोन टप्प्यात विशेष गोवर-रुबेला लसीकरण अभियान राबविण्यात येणार आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत दि. 15 डिसेंबर ते 25 डिसेंबर 2022 आणि 15 जानेवारी ते 25 जानेवारी 2023 या कालावधीत हे अभियान जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.
जिल्ह्यात गोवर उद्रेकाची व्याप्ती मर्यादित ठेवणे,रुग्ण संख्या व मृत्यु वर नियंत्रण राखणे, सामुहिक प्रतिकारशक्ती वाढविणे व येत्या प्रजासत्ताक दिनापर्यंत आपापल्या भागातील लसीकरणापासुन वंचित ९ महिने ते ५ वर्षे या वयोगटातील सर्व बालकांना एमआर १ व एमआर २ डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवून हे अभियान राबविण्यात येणार आहे. “ लस द्या बाळा, गोवर आजार टाळा” या घोषवाक्यासह हे अभियान राबविण्यात आहे.
या विशेष अभियानाच्या पूर्वतयारीसाठी आशा / अंगणवाडी कार्यकर्त्या / आरोग्य कर्मचारी /स्वयंसेवक यांच्या मदतीने ९ महिने ते ५ वर्षे वयोगटातील गोवर रूबेला लसीकरणापासून वंचित बालकांची यादी करुन लाभार्थींच्या संख्येनुसार आणि क्षेत्रानुसार अतिरिक्त लसीकरण सत्रांचे नियोजन करण्यात येणार आहे. या अभियानात स्वयंसेवी संस्था जसे आयएमआय, निमा, रोटरी क्लब यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. तसेच लसीकरण सत्रे आणि अभियानाची विविध माध्यमातून कार्यक्षेत्रात प्रसिद्धी करुन जास्तीत जास्त लाभार्थींचे लसीकरण करण्यात येणार आहे.
अभियान जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिली. तसेच जिल्हा परिषद अध्यक्षा पुष्पा गणेश पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष गोटिराम पवार तसेच सभापती आरोग्य व बांधकाम वंदना किसन भांडे यांनी या मोहिमे दरम्यान सर्व पालकांनी आपल्या मुला-मुलींना गोवर-रुबेलाची लस देऊन त्यांचे आरोग्य सुदृढ ठेवावे, असे आवाहन केले आहे.