पुणे : वार्ताहर
आपणही समाजाचे कांहीतरी देणे लागतो या उदात्त हेतूने सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक, कला क्रीडा, आस्थापना तसेच समाजातील वंचित व उपेक्षित घटक यांच्या प्रती सातत्याने अभ्यासूवृत्ती व सकारात्मक जोपासत भरीव कार्य करीत असल्यामुळे सुरेश केसरकर यांना पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन व कलादालन पुणे येथील मुख्य सभागृहात कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सुधाकरराव जाधवर यांच्या हस्ते तसेच प्रमुख अतिथी न्यायाधीश मा. सोनल पाटील, जीएसटी आयुक्त मा. सुरेंद्रकुमार मानकोसकर, डॉ. कुमार सप्तर्षी, निवृत्ती न्यायाधीश मा. आर. व्ही. जताळे, पोलीस उप आयुक्त संदीप गिल्ल (भापोसे), संविधान अभ्यासक सुभाष वारे, मानवाधिकारचे हायकोर्ट व सुप्रिम कोर्टचे कायदेतज्ञ असीम सरोदे तसेच सन्माननीय प्रमुख अतिथी त्याचबरोबर कार्यक्रमाचे निमंत्रक सन्मा. विकास कुचेकर, संचालक सन्मा. श्रीकांत (अण्णा) जोगदंड व सर्व कार्यकारिणी यांच्या उपस्थितीत – मानवी हक्क संरक्षण जागृती संस्था, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने १० डिसेंबर जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये “मानवाधिकार पुरस्कार” देऊन सन्मान करण्यात आला.
सुरेश केसरकर हे सातत्याने उत्कृष्ट संघटन कौशल्याच्या जोरावर समाजातील सर्वच घटकांप्रती कृतज्ञता जोपासत उल्लेखनीय कार्य करीत आहेत. स्वतः औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असून स्वतःची नोकरी सांभाळून, शासनाच्या विविध योजना व उपक्रम समाजामध्ये उत्कृष्टपणे राबविण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत आहेत. विविध संस्था, संघटना तसेच ट्रस्टच्या माध्यमातून अविरतपणे साहित्यिक, लेखक, कवी, समाजसेवक यांच्या कार्याचा सन्मान व्हावा त्यांना प्रोत्साहन मिळावे व त्यांचे देश हिताचे कार्य निरंतर चालू राहावे यासाठी, विविध सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांच्या लेखनाचे प्रकाशन करणे कामी महत्त्वपूर्ण भूमिका बजावीत असतात.
द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन, यशोदर्शन फाउंडेशन, व्ही 4 ऑर्गन्स फाउंडेशन तसेच राज्य गुणवंत कामगार असोसिएशन यांच्या सहयोगाने जिल्हा, राज्य व देश पातळीवर अवयवदान व देहदान याविषयी जनजागृती होण्याकरता पथनाट्ये, पोस्टर्स, मान्यवरांचे प्रबोधनात्मक व्याख्यान तसेच ऑनलाईन कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजातील सर्वच कार्यकर्त्यांनी देश हितासाठी या कार्यात सक्रीय व्हावे याकरिता विविध संघटनांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्नशील आहेत.
देशातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांचे निराकरण व्हावे, त्यांना वृद्धापकाळात सन्मानाने जगता यावे, त्यांची चांगल्या प्रकारे गुजराण व्हावी, निवृत्तीनंतर समाधानकारक पेन्शन मिळावी याकरिता सातत्याने जिल्हा, राज्य व देश पातळीवर पत्रव्यवहार व त्यासंबंधी पाठपुराव्याच्या माध्यमातून कार्यरत आहेत.
अवैधरित्या व चुकीच्या पद्धतीने सर्वसामान्य जनतेला फसवणाऱ्यांच्या विरोधात जिल्हा, राज्य प्रशासनाकडे पुराव्यासह लेखी पत्रव्यवहार व त्यासंबंधी पाठपुरावा करून त्यांनी जिल्हयातील अवैध धंदे बऱ्याच अंशी बंद करण्यास भाग पाडलेले आहे. यावेळी ते स्वतःच्या जीविताचा तसेच कुटुंबीयांचाही विचार करत नाहीत.
स्वतःचा जीव धोक्यात घालून आरोग्य विभागामधील जवळपास 850 बोगस ऑर्डर्स देणाऱ्या आरोपींना, जिल्हा प्रशासनाला पकडून देऊन मोलाचे सहकार्य केले आहे. या अतुलनीय कार्याबद्दल जिल्हा पोलीस प्रशासनाच्यावतीने त्यांचा जाहीर सत्कार देखील करणेत आलेला आहे. याच प्रमाणे कामगार विभागातील अवैद्य नोकर भरती प्रक्रिया रद्द करून, संबंधित अधिकाऱ्यांच्या गैरकारभाराची राज्य सरकारला दखल घेणे भाग पाडले.
पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील दिनदलित, वंचित व उपेक्षित घटक, शोषित कामगार वर्ग तसेच शासकीय सेवेत प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांच्या सर्वच प्रश्नांना न्याय मिळावा यासाठी, प्रभावी लेखणी तसेच अभ्यासू वृत्ती अंगीकारून शासन स्तरावरती सातत्याने आवाज उठवित असतात.
त्यांच्या एकंदरीती समाजाभिमुख कार्याची दखल घेत, जिल्हा प्रशासनाने सन 2004 पासून विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून तहयात नियुक्ती केलेली आहे.
महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यामध्ये राज्य गुणवंत कामगार असोसिएशन ही नोंदणीकृत संस्था असून या संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात समाजातील सर्वच घटकांप्रती अविरतपणे कार्य सुरू आहे. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या संचालक पदी सुद्धा महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल महोदयांच्या शिफारशीनुसार त्यांनी कार्य केलेले आहे.
इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून कामगारांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ वेळेवर मिळावा, यासाठी ते सातत्याने प्रशासनाच्या संपर्कात असतात.
लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांना प्रोत्साहन मिळावे व देशाची पुढील पिढी बलशाली होणेकामी महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असतात.
सर्व शासकीय कार्यालयामध्ये नागरिकांचा वेळ वाचावा, प्रशासनामध्ये सुशासन असावे, कोणत्याही अनुचित प्रथा तसेच गैरकृत्ये घडू नयेत, यासाठी माहिती जन माहिती अधिकार अधिनियम २००५ ला अनुसरून अभिलेख पाहणी, आरटीआय अर्ज व अपिल याद्वारे गैर कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांना योग्य त्या मार्गावर आणण्याचे तसेच वेळप्रसंगी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यास प्रशासनाला भाग पाडलेले आहे. याबरोबरच चुकीच्या पद्धतीने अधिकाऱ्यांना वेठीस धरणाऱ्या कार्यकर्त्यांना देखील अशा अपप्रवृत्ती पासून दूर राहण्यासाठी प्रबोधन करीत असतात. जिल्हा, राज्य व देश पातळीवरती ज्यावेळी नैसर्गिक आपत्ती आलेली आहे, त्यावेळी स्थानिक प्रशासनाच्या सहकार्यास ते तत्पर हजर असतात. समाजातील गोरगरीब कामगार व इतर घटक व्यसनाच्या आहारी जाऊन आपले तसेच आपल्या कुटुंबियांचे नुकसान करून घेत असतात, त्यांच्यासाठी व्यसनमुक्ती शिबिराचे आयोजन करून प्रबोधनाचे महत्त्वाचे कार्य देखील सहकाऱ्यांच्या मदतीने करीत असतात.
महाराष्ट्र कामगार कल्याण अधिनियम 1953 ची संपूर्ण राज्यांमध्ये कडक अंमलबजावणी व्हावी व शासनाच्या योजना तसेच उपक्रमांचा लाभ लाखो कामगारांना मिळावा यासाठी, राज्य सरकारकडे आग्रही मागणी करून त्यांना न्याय हक्क मिळणेकामी महत्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे.
त्यांचे सामाजिक कार्यातील बहुमोल योगदान, सातत्य, जिद्द, चिकाटी, समाजाप्रती झोकून देऊन काम करण्याची वृत्ती व महत्त्वाकांक्षी ध्येयामुळे तसेच सर्व क्षेत्रातील अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर त्यांना जिल्हा, राज्य व आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
उपरोक्त संस्थेच्यावतीने मानवाधिकार पुरस्कार मिळाल्याबद्दल यापुढील काळातही समाजाप्रती भरीव कामगिरी करण्यास ऊर्जा मिळाली आहे तसेच या पुरस्कारामुळे आपल्या जबाबदारीमध्ये वाढ झाली असल्याचे त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना आवर्जून सांगितले.
त्यांना हा प्रतिष्ठेचा व नावलौकिक वाढविणारा पुरस्कार मिळाल्यामुळे जिल्हा, राज्य व देश पातळीवरून त्यांच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.