बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

ठाणे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांप्रती आदरभाव म्हणून सैनिक व त्यांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी ध्वजदिन निधी संकलन, जिल्हा देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिक व त्यांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी समाजातील सर्व घटकांनी पुढे येणे आवश्यक- अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ..

अमित जाधव - संपादक

ठाणे, (प्रतिनिधि) दि.11:-देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांप्रती आदरभाव म्हणून सैनिक व त्यांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी समाजातील सर्व घटकांनी पुढे येणे आवश्यक आहे आणि त्यासाठी ध्वजदिन निधी संकलनात सर्वांनी जास्तीत जास्त योगदान द्यावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे यांनी आज येथे केले.

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने जिल्हा नियोजन भवन येथे झालेल्या कार्यक्रमात ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते आज झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या.
याप्रसंगी ठाणे जिल्हा परिषदेच्या अपर मुख्य अतिरिक्त कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते, अपर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली घाटे, भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री.संजय हेरवाडे, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, जिल्हा पुरवठा अधिकारी विकास गजरे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर प्रांजळ जाधव, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भाऊसाहेब कारेकर, सहायक पोलीस आयुक्त (मुख्यालय-1) ममता लॉरेन्स डिसोझा, सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अशोक डोंगरे, माजी सैन्याधिकारी-सैनिक, शासकीय अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी, प्रसारमाध्यम प्रतिनिधी उपस्थित होते.
अपर जिल्हाधिकारी श्रीमती. जायभाये-धुळे म्हणाल्या, ज्या सैनिकांमुळे आपण आपल्या दैनंदिन जीवनात सुरक्षितपणे राहत आहोत, त्यांच्या व त्यांच्या कुटुंबाच्या प्रति आदरभाव ठेवून त्यांचा अभिमान बाळगणे, हे आपले सर्वांचे नैतिक कर्तव्य आहे. 136.64 टक्के उद्दिष्ट्य पूर्ण केल्याचा आनंद असला तरी सर्वांनी ध्वजदिन निधी संकलनास आपले जास्तीत जास्त योगदान देवून विहित कालावधीत उद्दिष्ट्य पूर्ण करुन जिल्ह्याला अग्रेसर ठेवावे.
अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.दिपाली घाटे यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले.
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रांजळ जाधव यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करुन प्रास्ताविक केले. ते म्हणाले, मागील वर्षाप्रमाणेच यंदाही 1 कोटी 84 लाख 80 हजार रुपयांचे उद्दिष्ट्य आपल्याला मिळाले असून त्यापैकी 2 कोटी 52 लाख 52 हजार 171 इतका निधी संकलन झाला आहे. सन 2023 साठी आपल्या जिल्हयाने आतापर्यंत 136.64 टक्के निधी संकलनाचे उद्दिष्ट्य साध्य केले आहे. सन 2023-24 या वित्तीय वित्तीय वर्षात 27 लाख 1 हजार 280 रुपयांची मदत विविध कारणांसाठी कल्याणकारी निधीतून वाटण्यात आली आहे.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी “अमर जवान” प्रतिमेला पुष्पचक्र वाहून शहिदांना आदरांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी विशेष गौरव पुरस्कारप्राप्त तसेच सशस्त्र सेना ध्वजदिन-2022 च्या निधी संकलनाचे उल्लेखनीय कार्य केलेल्या व वेळेआधीच उद्दिष्ट पूर्तता केलेल्या विविध शासकीय विभाग/संस्था/व्यक्तींचा स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र व भेट वस्तू देवून सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीताने करण्यात आली तर सांगता राष्ट्रगीताने संपन्न झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन वृंदा दाभोलकर यांनी केले व आभार प्रदर्शन सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अशोक डोंगरे यांनी केले.
*विशेष उल्लेखनीय:-*
याप्रसंगी दिलीप गुप्ते यांनी लिखाण केलेले व ठाणे जिल्हा माहिती अधिकारी श्री.सानप यांनी प्रस्तावना लिहिलेले “महारथी महाराष्ट्राचे भाग-4” या पुस्तकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. त्याचबरोबर ध्वजदिन निधी संकलन या विषयावर जनजागृतीपर लघुचित्रफितीचेही उद्घाटन करण्यात आले. या फिल्मसाठी विशेष योगदान दिलेल्या जिल्हा माहिती अधिकारी श्री.सानप, श्री.दिलीप गुप्ते, रिध्दीश पाटील, रमेश शेळके यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
*ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाकडून सशस्त्र सेना ध्वजदिन निधीला सढळ हातभार*

*सेना ध्वजदिन निधीला साह्य करणारा राज्यातील पहिलाच पत्रकार संघ*
ठाणे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे सशस्त्र सेना ध्वजदिन निधी २०२३ संकलनाला ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाकडून सढळ हस्ते हातभार लावण्यात आला. पत्रकार संघाच्या वतीने सशस्त्र सेना ध्वजदिन निधीसाठी ११ हजारांचा धनादेश जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर प्रांजळ जाधव (नि.) यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी अशा प्रकारे निधी संकलनाला हातभार लावणारा राज्यातील हा पहिलाच पत्रकार संघ असून पत्रकारसंघाने उचललेले हे पाऊल समाजापुढे आदर्शवत असल्याच्या भावना व्यक्त केल्या.
या कार्यक्रमाला ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे, ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे, शहर पत्रकार संघाचे उपाध्यक्ष दीपक शेलार, सचिव निलेश पानमंद, खजिनदार विभव बिरवटकर, सहसचिव गणेश थोरात,सदस्य अमर राजभर, अनुपमा गुंडे आदींसह मनोज सिंह, अमोल कदम, रोहिणी दिवाण, विरेंद्र मिश्रा उपस्थित होते.
याशिवाय लक्षवेधी परिवाराकडून डॉ.अतुल राठोड यांनी रु.25 हजारांचा धनादेश धनादेश जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडे सुपूर्द केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे