अखेर राजगर्जना होणारच,ठाण्यात ९ ऐवजी १२ एप्रिलला होणार राज ठाकरे यांची जाहिर सभा…..
अमित जाधव-संपादक
ठाण्यात ९ ऐवजी १२ एप्रिलला होणार राज ठाकरे यांची जाहिर सभा
ठाणे,वार्ताहर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ९ एप्रिल रोजीच्या ठाण्यातील जाहीर सभेला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने आता ही उत्तर सभा १२ एप्रिल रोजी होणार आहे. अशी माहिती मनसे नेत्यांनी गुरुवारी सायंकाळी ठाण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मनसे नेत्यांनी मविआ सरकारकडून केल्या जाणाऱ्या अडवणुकीचा पाढा वाचला. ह्यांनी घातलेला गोंधळ चालतो आणि मनसेच्या सभेला परवानगी द्यायची नाही. ही कसली लोकशाही असा सवाल मनसेच्या संदीप देशपांडे यांनी करून येत्या १२ एप्रिलला या सर्वाची उत्तरक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे करतील.असा गर्भित इशारा पत्रकार परिषदेच्या माध्यमातुन देण्यात आला. दरम्यान,तब्बल १० तास खलबते केल्यानंतर पोलिसांनी सभेच्या ठिकाणाबाबतचे मौन सोडुन अखेर १२ एप्रिल रोजी गडकरी रंगायतन नजीक डॉ.मुस रस्त्यावरच सभेला परवानगी दिल्याचे समज पत्र मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना सुपूर्द केले.
मराठीच्या मुद्यासोबतच ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंगे काढण्याचे आणि मदरशांवर धाडी टाकण्याची भूमिका मांडुन महाविकास आघाडी सरकारला अल्टीमेटम दिला होता. त्यानंतर या वक्तव्याचे सर्वत्र पडसाद उमटले. मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली. याला मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी जोरदार प्रत्युत्तर देत आव्हाड यांच्या मुस्लीम प्रेमावर टीका केली होती. महाआघाडीतील इतर नेत्यांसह वंचित आघाडीकडुनही राज यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आले होते.या सर्व आरोप – प्रत्यारोपांना सडेतोड उत्तर देण्यासाठी राज ठाकरे यांची ९ एप्रिल रोजी ठाण्यातील मूस रोडवर उत्तर सभा घेण्याचे ठरवले होते. विधानसभा निवडणुकीनंतर प्रदीर्घ काळाने ठाण्यात ही पहिलीच जाहिर सभा होत असल्याने मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह हजारो मनसैनिक सभा यशस्वी करण्यासाठी झटत होते.मात्र, पोलिसानी ऐन नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर सभेसाठी गर्दी उसळुन वाहतुकीची प्रचंड समस्या निर्माण होईल. असे कारण देत सभेला परवानगी नाकारली होती
मनसेच्या या उत्तर सभेसाठी सुरुवातीला गडकरी रंगायतन समोरील डॉ.मुस रोडवरील रस्ता निश्चित करून मनसे नेते नितिन सरदेसाई यांनी बुधवारी पाहणीही केली होती. मात्र, पोलिसांनी या रस्त्यावर सभेसाठी परवानगी नाकारल्याने गुरुवारी सकाळी बाळा नांदगावकर यांनीही ठाण्यात भेट देऊन रस्त्यावर टेबल टाकुन राज ठाकरे यांची सभा घेण्याचा निर्धार व्यक्त केला होता.दरम्यान, गुरुवारी दिवसभर मनसे नेत्यांनी काथ्याकूट केल्यानंतर पोलीसांनी नमते घेत ९ एप्रिल ऐवजी १२ एप्रिल रोजी गडकरी रंगायतन येथील डॉ.मूस रस्त्यावरील सभेला परवानगी दिली आहे.


