अतीधोकादायक इमारती तातडीने खाली करा,ठाणे महापालिका – अभिजित बांगर, आयुक्त,तर डेंजर झोन मध्ये दिव्यातील किती इमारती आहेत पहा संपूर्ण बातमीत…..
अमित जाधव - संपादक
ठाणे शहरात अती धोकादायक घोषित करण्यात आलेल्या इमारती नागरिकांच्या जिविताच्या सुरक्षेसाठी तातडीने रिकाम्या कराव्यात. त्या इमारती रिकाम्या करताना महापालिका अधिकाऱ्यांनी नागरिकांशी सौजन्याने वागावे, अरेरावी करू नये, असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. पावसाळा पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्तांनी शुक्रवारी बैठक घेतली. या बैठकीत, रिक्त करायच्या अती धोकादायक इमारती, त्यातील अडचणी, पर्यायी व्यवस्था, संक्रमण शिबिरे आदींबाबत चर्चा झाली.
अती धोकादायक (सी 1 वर्ग) आणि धोकादायक (सी 2 a वर्ग) या दोन्ही प्रकारातील इमारतींचा पाणी आणि वीज पुरवठा तत्काळ खंडित करावा. जुन्या किंवा मोडकळीस आलेल्या इमारतींबाबत पावसाळ्यापूर्वी करावयाच्या कार्यवाहीबद्दल नगरविकास विभागाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. यात अजिबात दिरंगाई होऊ नये, असे निर्देशही आयुक्त बांगर यांनी दिले.
ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण ८६ अती धोकादायक इमारती आहेत. त्यातील ३७ इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. तर, ४९ इमारतींमध्ये नागरिकांचा निवास आहे. या ४९ अती धोकादायक इमारती तातडीने रिकाम्या कराव्यात असे निर्देश आयुक्त बांगर यांनी दिले. या इमारतींमधील नागरिकांनी तत्काळ पर्यायी जागेत स्थलांतरित व्हावे. अती धोकादायक अधिकृत इमारतींमधील रहिवाशांची पर्यायी व्यवस्था होत नसल्यास, तसेच त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आवश्यकता भासल्यास, तात्पुरती पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे, असेही आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले.
इतक्या इमारती आहेत डेंजर झोनमध्ये :
महापालिकेकडून नोंदवण्यात आलेल्या यादीमध्ये मुंब्रा प्रभागात १ हजार ३४०, वागळे इस्टेटमध्ये १ हजार १०१, दिवा प्रभागात ६५४, नौपाडा- कोपरी ४३३, लोकमान्य- सावरकरनगर २२१, कळवा १७३, उथळसर १५३, माजीवडा मानपाडा १५८ इमारती धोकादायक आहेत. तर यंदा सर्वेक्षणामध्ये वर्तकनगरमध्ये एकही धोकादायक इमारत नसल्याचे समोर आले आहे. मुंब्रा आणि वागळे इस्टेट या दाट लोकवस्तीच्या भागामध्ये सर्वाधिक धोकादायक इमारती असल्यामुळे या भागातील रहिवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. पावसाळ्यामध्ये या भागात दुर्घटना घडण्याची धास्ती असल्याने नागरिकांच्या मनात असताना ते जीव मुठीत घेऊन या इमारतीमध्ये वास्तव्य करत आहेत.