
ठाणे ता ११ जुलै : दिवा रेल्वे स्थानक पूर्व परिसर, दिवा आगासन रोड व मुंब्रादेवी कॉलनी रोड भागामध्ये रस्त्यावर वाहनांचे बेशिस्त पार्किंग मोठ्या प्रमाणात दिसुन येते. त्यामुळे परिसरातील नागरिकांना व प्रवाशांना वाहतुकीच्या दृष्टीने प्रचंड अडचणीचा सामना करावा लागत आहे. नुकतीच काही दिवसापूर्वी वाहतूक विभागाची टोइंग करणारी गाडी सुरु झाली असून सदर गाडी फक्त दिवा स्थानक परिसरात येते आणि तेथून फक्त दुचाकी उचलून नेत असते मात्र कोणत्याही प्रकारची चारचाकी वाहनांवर कारवाई करताना दिसत नसून यामध्ये पारदर्शकता दिसून येत नाही असा आरोप दिवा वंचित बहुजन विकास आघाडीचे विकास इंगळे यांनी केला आहे.
ठाणे शहर वाहतूक विभाग हा दिवा परिसरात कायदा अंमलबजावणीसाठी येतो की फक्त महसूल वसुलीसाठी ? फक्त दुचाकीं गाड्यावरच का कारवाई केली जाते ? रस्त्याच्या कडेला अनेक ठिकाणी चारचाकी वाहने बेशिस्तपणे पार्क केलेली असतात आणि ते वाहतुकीला अडथळा निर्माण करतात त्यांच्यावर मात्र कुठलीच कारवाई होत नाही ही बाब गंभीर असून पक्षपाती कार्यपद्धतीने वाहतूक विभाग काम करताना दिसत आहे. दिवा परिसरातील सर्व मुख्य रस्त्यांवर फक्त दुचाकी नव्हे तर चारचाकी वाहनांनवर देखील कठोरतेने कारवाई व्हावी. तसेच वाहतूक विभागाने कारवाईचा तपशील नागरिकांसमोर वेळोवेळी प्रसिद्ध करावा. जर पुढील सात दिवसांत सदर मागण्यांवर योग्य ती पावले उचलली गेली नाहीत तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्थानिक पातळीवर आंदोलन छेडण्यात येईल असे दिवा, मुंब्रा शहर वाहतूक उपविभागाचे वपोनि भरत चौधरी यांना निवेदन देऊन दिवा वंचित बहुजन विकास आघाडीचे विकास इंगळे यांनी स्पष्ट केले आहे.