काही दिवसापूर्वी सहायक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण झालेलं प्रकरण,जितेंद्र आव्हाड यांचा न्यायालयात गुन्हा रद्द करावा यासाठी अर्ज तर सोबत आहेर यांचे चार पानी प्रतिज्ञा पत्र देखील झोडले..
अमित जाधव - संपादक
2023 मध्ये ठाणे पालिकेचे सहायक आयुक्त महेश आहेर यांनी आमदार आव्हाड यांच्या मुली व जावयाच्या हत्येची सुपारी दिल्यासंदर्भात कथित ऑडिओ क्लिप समोर आली होती. मात्र या क्लिपनंतर पाच ते सहा जणांनी आहेर यांना ठाणे पालिका मुख्यालयासमोरच मारहाण केल्याची घटना घडली होती.
त्यावेळी आहेर यांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करताना मारहाण करणाऱ्यांनी जितेंद्र आव्हाड यांचे नाव घेत आपल्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार नौपाडा पोलिस ठाण्यात दाखल केली होती. त्यानुसार, नौपाडा पोलिसांनी आव्हाड यांच्यासह त्यांच्या सहा कार्यकर्त्यांवर गुन्हा देखील दाखल केला होता. तत्पूर्वी जितेंद्र आव्हाड यांनीही एका ऑडिओ क्लिपचा हवाला देत आहेर गुन्हेगारांच्या साथीने आपल्या तसेच कुटुंबीयांच्या हत्येचा कट रचत असल्याची तक्रार नौपाडा पोलिस ठाण्यात दाखल केली होती.
मात्र आता आव्हाड यांनी मुंबई उच्च न्यायालयात गुन्हा रद्द करण्यासाठी अर्ज दाखल केला होता. यामध्ये असे सांगण्यात आले होते की, या गुन्ह्याचा आणि आपला काहीही संबंध नसल्याचा दावा आव्हाड यांनी केला आहे. या अर्जात आव्हाड यांनी आहेर यांचे चार पानी प्रतिज्ञापत्र देखील जोडले असून यात आहेर यांनी नौपाडा पोलिस ठाण्यात आव्हाड यांच्याविरोधातील तक्रार गैरसमजातून केल्याचे म्हटले आहे. एका ऑडिओ क्लिपमधला आवाज हा माझा आहे या गैरसमजातून हा हल्ला झाला होता. मात्र त्यात आव्हाड यांचा काहीही संबंध नसल्याचे मला स्पष्ट झाले आहे असे आहेर म्हणाले आहेत . मात्र आता या घटनाक्रमामागे पडद्यामागून राजकीय हालचाली सुरू असण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे



