प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या रस्ते सुरक्षा अभियान व जनजागृतीपर चित्ररथाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन..
अमित जाधव - संपादक
प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या रस्ते सुरक्षा अभियान व
जनजागृतीपर चित्ररथाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन
ठाणे दि.11 (जिमाका) : प्रादेशिक परिवहन कार्यालय व ठाणे जिल्हा रस्ते सुरक्षा समितीच्यावतीने आयोजित राष्ट्रीय रस्ते सुरक्षा अभियानाची सुरूवात आज जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते जनजागृतीपर चित्ररथाच्या उद्घाटनाने झाली. या अभियानाअंतर्गत पुढील सात दिवस विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात झालेल्या या कार्यक्रमास सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद नलवडे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी गणेश पाटील, लेखा अधिकारी अपर्णा पाटणे यांच्यासह सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, मोटार वाहन निरीक्षक उपस्थित होते.
रस्ते सुरक्षा अभियानाअंतर्गत विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षा विषयक समुपदेशन व मार्गदर्शन कार्यशाळा, अवजड वाहन चालक व रिक्षा चालकांसाठी आरोग्य व डोळे तपासणी शिबिर, विविध टोलनाक्यांवर जनजागृती करणे, मोटार सायकल व रिक्षा रॅली आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच वाहन चालकांसाठी 7 फेब्रुवारीपर्यंत परिवहन कार्यालयात व्यावसायिक वाहनचालकांसाठी मुख आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, रस्ते अपघात टाळण्यासाठी रस्ते सुरक्षा विषयक जनजागृती वर्षभर केली जावी. यामध्ये प्रशासनासह जनतेनेही सहभागी व्हावे. अपघाताचे प्रमाण कमी करून आपला प्रवास सुरक्षित होण्यासाठी सर्वांची जनजागृती करण्यासाठी परिवहन विभागाने चित्ररथ तयार केला आहे. अपघाताचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रयत्न करत आहोत. यासाठी कार्यप्रणाली तयार केली पाहिजे.
यावेळी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय शेळके यांनी वाहनचालकांसाठी तयार केलेल्या रस्ते सुरक्षा विषयक प्रतिज्ञेच्या फलकाचे अनावरण जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांच्या हस्ते करण्यात आले.
०००००



