महिलांना ब्लॅकमेलिंग करून मैत्रीच्या नावाखाली अत्याचार करणा-या नराधमाला गोव्यातून अटक…
अमित जाधव-संपादक
*कळवा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी,दिव्यात राहणाऱ्या नराधमाला गोव्यातून अटक…..*
महिलांना ब्लॅकमेलिंग करून मैत्रीच्या नावाखाली अत्याचार करणा-या नराधमाला कळवा पोलीसांनी अटक केली आहे. दिव्यात राहणा-या गणेश सुरवसेने मैत्रीचा फायदा घेऊन त्याच्या शेजारी राहणा-या महिलेला वाढदिवसाला घरी बोलावले आणि सरबतामध्ये मद्य टाकून या महिलेवर अत्याचार केला. याचे व्हीडीओ आणि फोटो सामाजिक संकेतस्थळावर टाकण्याची धमकी देऊन त्याने या महिलेवर सतत अत्याचार केले. मात्र काही दिवसानंतर या महिलेनं त्याला भेटणं आणि बोलणं बंद केलं. त्यावेळी त्याने हे फोटो आणि व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. या महिलेचं लग्न ठरत असल्याचं कळल्यावर त्याने फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर तिच्या नावाचे बनावट अकाऊंट उघडून व्हीडीओ आणि फोटो व्हायरल केले आणि तिचं लग्न मोडण्याचा प्रयत्न केला. यामुळे तिला अनेक दूरध्वनी येऊ लागले. त्यामुळे त्रस्त झालेल्या या महिलेने याप्रकरणी पोलीसांकडे तक्रार केली. पोलीसांनी त्याचा तपास सुरू केला त्यावेळी तो कर्नाटकमधून असा प्रकार करत होता. सुरवसे हा यामुळे या महिलेचे नातेवाईक, ही महिला आणि पोलीसांनाही फोन करून त्रास देत होता. त्यामुळे पोलीस त्याची माहिती घेत होते. त्यावेळी तो गोव्यावरून फोन करत असल्याचं पोलीसांना समजलं. पोलीसांनी गोव्यातून त्याला अटक केली त्यावेळी तो अशाच प्रकारे इतर महिला आणि मुलीनाही अश्लील मेसेज, फोटो पाठवत असल्याचं समोर आलं. तो विकृत स्वभावाचा असल्याचंही निष्पन्न झालं असून पोलीसांनी त्याला अटक केली आहे.


