दहावी बारावीचा निकाल जून मध्ये बहुतेक,७५ टक्क्यांपेक्षा अधिक उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया पूर्ण…
अमित जाधव-संपादक
दहावी बारावीचा निकाल जून मध्ये बहुतेक,७५ टक्क्यांपेक्षा अधिक उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया पूर्ण
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने करोनामुळे दहावी, बारावी परीक्षेचे वेळापत्रकात काही बदल केले. परीक्षा घेण्यावर ठाम राहत मंडळाने २०२२च्या परीक्षा घेतल्या. दहावी परीक्षा १५ मार्च ते चार एप्रिल, बारावीची परीक्षा चार मार्च ते सात एप्रिल दरम्यान घेण्यात आली. परीक्षेनंतर उत्तरपत्रिका तपासणीचे प्रक्रियाही मंडळाने सुरू केली. औरंगाबाद उत्तरपत्रिका तपासणीत सुरुवातीला इतर विभागांच्या तुलनेत मागे होते. त्यामुळे मंडळाची सुरुवातीला धांदल उडाली, परंतु मंडळ अधिकाऱ्यांनी नियोजनात बदल केले. त्यामुळे यंदा गठ्ठे परत येण्याचे प्रमाण अत्यल्प होते. यंदा ऐनवेळी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली. ऐनवेळी परीक्षेला नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या पाच हजारच्या जवळपास असल्याचे सांगण्यात येते. ऐनवेळ परीक्षेला नोंदणी केलेल्या परीक्षार्थींचे उत्तरपत्रिका तपासणीचे नियोजन मंडळ विभागीय कार्यालय पातळीवरून झाले. पेपर झाल्यानंतर कस्टडीतून उत्तरपत्रिकांचे गठ्ठे तपासणीसाठी मॉडरेटरकडे जातात. प्रत्येक विषयाला २१ दिवस असा वेळ दिला जातो. सोमवारी राज्य मंडळाने विभागीय पातळीवरील आढावा घेतला. औरंगाबाद विभागाचा ७५ टक्क्यांपेक्षा अधिक उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगण्यात येते. यंदा बारावीला विभागातून १ लाख ६९ हजार २८९ तर, दहावीला एक लाख ८५ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
दहावी, बारावीचा निकाल वेळेत जाहीर होईल असे मंडळाचे अधिकारी सांगत आहेत. यंदा बारावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात तर, त्याच्याच दुसऱ्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होईल, असे सूत्रांनी सांगितले. त्या अनुषंगाने उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया सुरू आहे, यंदा परीक्षेच्या वेळापत्रकात ऐनवेळी बदल झाला. दोन पेपर पुढे ढकलण्यात आले. त्या पेपरमुळे तपासणीसाठीचा कालावधी वाढू शकतो, असेही सांगण्यात येते. हे लक्षात घेत उत्तरपत्रिका तपासणीसाठी राज्य मंडळाने एप्रिल अखेरपर्यंत विभागीय मंडळांना मुदत दिली असल्याचेही मंडळातील अधिकारी सूत्रांनी माहिती दिली.


