दिव्यातील दातीवली तलावाच्या सुशोभिकरण करणाऱ्या कामगारांची सुरक्षा ठेकेदाराने वेशीला टांगली…
अमित जाधव - संपादक

ठाणे, दिवा ता १० मार्च : ठाणे महापालिका हद्दीतील दिव्यातील दातीवली तलावाच्या सुशोभिकरण कामाची घरघर सुरूच असल्याचे चित्र दिसून येत आहे. केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.० अभियानांतर्गत ठाणे महापालिका क्षेत्रातील सरोवर पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत दातीवली तलावाचे संवर्धन व सुशोभीकरणाचे काम १८/०४/२०२३ रोजी १२ महिन्यांच्या मदतीसह मे. यु. सी. सी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि यांना देण्यात आले होते. परंतू सदरचे काम विहित मुदत पूर्ण होऊन देखील रखडलेले दिसून येत असून मुदत संपल्यानंतर मुदत वाढ न घेता कंत्राटदाराने कामगारांच्या विम्याचे नूतनीकरण न करता परस्पर जानेवारी २०२५ ला काम सुरु करून कंत्राटी कामगारांचा जीव धोक्यात टाकून बिनधास्त पणे कंत्राटदाराने केले आहे. सध्या ही तलावाची परिस्थिती जैसे थे असून याकडे दुर्लक्ष करून महापालिकेच्या कार्यपद्धती व सूचनांना पायदळी तुडवण्याचे काम ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांनी केले असल्याचे दिसून येत असल्याचे ठाकरे शिवसेनेचे विभागप्रमुख नागेश पवार यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
प्रकरणी रखडलेल्या दातीवली तलावाच्या सुशोभिकरण कामाची संबंधित ठेकेदार व बेजवाबदार अधिकाऱ्यांवर शासकीय नियमानुसार कारवाई करण्यात यावी तसेच कंत्राटी मजुरांच्या संरक्षण विम्याचे नूतनीकरण व संबंधित कामाला पालिकेची मुदतवाढ मिळे पर्यंत काम बंद करण्यात यावे असे लेखी निवेदन ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरव राव यांना ठाकरें शिवसेनेचे दिवा विभाग प्रमुख नागेश पवार यांनी केले आहे.