पाण्यासाठी दिवा पश्चिमे कडील रहिवासीयांचा आक्रोश,पाणी नसताना बिल मात्र भरमसाठ…..
अमित जाधव-संपादक
अँड.आदेश भगत यांच्या नेतृत्वाखाली रहिवाशांनी घेतली सहायक आयुक्तांची भेट.
एन. आर. नगर, क्रिश कॉलनी, नागवाडी, बंदर आळी, बालदा नगर, गणेश चौक, परिसरातील असून गेली अनेक वर्ष या विभागाला ठाणे महानगरपालिकेकडून पाणीपुरवठा केला जात नाही. दिवा शहराच्या शेवटच्या टोकाला असल्यामुळे या विभागाला पाणी पोहोचत नाही असे सांगितले जाते. गेल्या अनेक वर्षात या विभागातून पाणीटंचाई दूर व्हावी किंवा या विभागातील नागरिकांना ठाणे महानगरपालिकेचे पाणी मिळावं, यासाठी अनेक निवेदनं व आंदोलने या विभागाच्या वतीने करण्यात आली होती. या विभागातील पाणीटंचाई विषयी अनेक प्रसार माध्यमांमध्ये, वृत्तवाहिन्यांमध्ये व वर्तमानपत्रात छापून देखील आलेले आहे. या विभागातील नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी लोकल ट्रेन पकडून मुंब्र्याला देखील पाणी आणण्यासाठी जात होते आणि अशा प्रकारे आपली तहान भागवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या नागरिकांना रेल्वे अपघाताला देखील सामोरे जावे लागले आहे. या विभागातील काही नागरिकांचा पाणी आणण्यासाठी जात असताना लोकलची धडक लागून मृत्यू देखील झालेला आहे. असे सर्व असताना या विभागातील पाणीटंचाई दूर व्हावी यासाठी ठाणे महानगरपालिका प्रशासनाने कोणतेही प्रयत्न आजतागायात केलेले दिसत नाही.
सध्या या विभागाला वर्षभरापासून जेमतेम पाणीपुरवठा केला जातोय परंतु, तोही दहा ते वीस लिटर इतकाच मिळतो. त्यामुळे ह्या परिसरातील नागरिकांना प्रामुख्याने बोरवेल च्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. या विभागाला मागील वर्षभरापासून जेमतेम पाणीपुरवठा होत असला तरी यापूर्वीची अनेक वर्ष या विभागाला पाण्याचा थेंब सुद्धा बघायला मिळाला नाही. असे असताना ठाणे महानगरपालिका प्रशासन मात्र या विभागाला भरमसाठ पाण्याची वेळ पाठवत आहे. बऱ्याच इमारतींना नियमित बिल सुद्धा पाठवलेलं नाही आणि अचानक ह्या इमारतींना बिल पाठवल्यामुळे रहिवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेलं आहे. अनेक इमारतींची बिलं ही लाखोंच्या घरात असून ती बिलं भरणे हे इथल्या सामान्य रहिवाशांच्या आवाक्या बाहेर आहे. शिवाय पाणीपुरवठा केलेला नसतानाही बिल भरणे, बिलं पाठवणं आणि ती रहिवाशांना भरायला लावणं हे कुठेतरी नैसर्गिक न्यायाच्या विरोधात आहे. या विभागातील पाणीटंचाई ही सर्वश्रुत असून पालिकेच्या बहुतांश अधिकाऱ्यांना ही सत्यता माहित देखील आहे. या विभागात असणाऱ्या इमारतींची पाणी बिलं रद्द करून या विभागाला अभय योजनेद्वारे नव्याने नळ जोडणी करून मिळावी व पाण्याचे मीटर देखील बसून द्यावेत, जेणेकरून येथील रहिवासी नियमित बिल भरणा करतील.
आम्हाला पाठवण्यात आलेली लाखोंची बिल रद्द करण्याविषयी पालिका प्रशासनाने धोरणात्मक निर्णय घ्यावा आणि आम्हा रहिवाशांना न्याय द्यावा. याकरिता आम्हाला कुठल्याही प्रकारचे लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्यास भाग पाडू नये असे निवेदन रहिवाशांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी शिवसेनेचे स्थानिक शाखाप्रमुख नितीन ओतूरकर, शिवाजी सुतार, भरत मोर्या व इमारतींमधील रहिवासी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.