
कळवा, मुंब्रा, दिवा क्षेत्रातील दिव्यांगासाठी मोजमाप मूल्यांकन शिबीर…
दि. २१ आणि २२ जानेवारी रोजी मौलाना अबुल कलाम आझाद क्रीडा संकुलात होणार शिबीर
*ठाणे (१८) :ठाणे महानगरपालिका, समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, ठाणे व भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (एलिम्को) यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील कळवा, मुंब्रा व दिवा प्रभाग क्षेत्रातील दिव्यांग प्रमाणपत्रधारक व ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी कृत्रिम अवयवाकरीता मोजमाप मूल्यांकन करण्यात येणार आहे. हे मोजमाप मूल्यांकन शिबीर दि. २१ आणि २२ जानेवारी रोजी मुंब्रा येथील मौलाना अबुल कलाम आझाद, क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात कोणतेही साहित्य वाटप होणार नसून केवळ लाभार्थ्यांची नोंदणी आणि मोजमाप मूल्यांकन होईल, असे समाजविकास विभागाने स्पष्ट केले आहे.
*मिळणारे साहित्य*
एडीआयपी योजनेत दिव्यांगजनांना तसेच आरव्हीवाय योजनेत ज्येष्ठ नागरीकांना विविध साहित्याचे वाटप केले जाते. दिव्यांगजनांना तीन चाकी सायकल, व्हिल चेअर, बॅटरीवर चालणारी मोटोराइज्ड तीन चाकी सायकल, कुबड्या, वॉकिंग स्टिक, सीपी चेअर, बोटोई श्रवणयंत्र, ब्रेल केन, ब्रेल स्लेट, ब्रेस कीट, सुगम्य केन, स्मार्ट फोन, कृत्रिम अवयव, कॅलिपर या साहित्याचे वाटप केले जाते.
तर, ज्येष्ठ नागरिकांना व्हिल चेअर, कमोडसह व्हिल चेअर, कमोड खुर्ची, कुबड्या, चालण्यासाठी काठी, ट्रायपॉड, टेट्रापॉड, चष्मा, श्रवण यंत्र, ग्रीवा कॉलर, गुडघा ब्रेस, डेन्चर, एलएस वेल्ट इत्यादी साहित्याचे वाटप केले जाते.
या साहित्य वाटपापूर्वी त्यांचे मोजमाप मूल्यांकन करण्याची आवश्यकता असते. त्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती समाज विकास अधिकारी दशरथ वाघमारे यांनी दिली आहे.
*शिबिराचा कालावधी*
मंगळवार, २१ जानेवारी रोजी स. १० ते सायं. ५ या वेळेत कळवा प्रभाग क्षेत्रातील दिव्यांग जन आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी शिबीर होईल.
तर, बुधवार, २२ जानेवारी रोजी स. १० ते सायं. ५ या वेळेत मुंब्रा आणि दिवा प्रभाग क्षेत्रातील दिव्यांग जन आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी शिबीर होईल.
*आवश्यक कागदपत्रे*
दिव्यांग प्रवर्गात अस्थिव्यंग, बहुविकलांग, सेरेबल पाल्सी, कर्णबधीर, पूर्णतः अंध यांचा समावेश आहे. त्यांनी १. दिव्यांगत्व दर्शविणारा एक फोटो. २. आधार कार्ड/ आधार नोंदणी पावती. ३. UDID कार्ड किवा दिव्यांगत्व प्रमाणपत्र किमान ४०% व UDID साठी नोंद केलेली नोंद पावती. ४. उत्पन्नाची प्रत (सर्व स्त्रोताकडून मासिक उत्पन्न रु. २२,५००/- पेक्षा जास्त नसावे.) (महसूल विभाग/बीपीएल रेशनकार्ड प्रत/ दिव्यांगत्व पेन्शन प्रमाणपत्राची प्रत/खासदार/आमदार/जिल्हा परिषद/ग्रामप्रधान सरपंच यांच्याकडील प्रमाणपत्र) ५. दृष्टिहीन लाभार्थ्यांच्या बाबतीत शैक्षणिक नाव नोंदणीचा पुरावा (शाळा सोडल्याचा दाखला/बोनाफाईड) ही कागदपत्रे सोबत आणायची आहेत.
तर, आरव्हीवाय योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिकांनी १. एक छायाचित्र. २. आधार कार्ड/ आधार नोंदणी पावती ३. उत्पन्नाची प्रत (सर्व स्त्रोताकडून मासिक उत्पन्न रु. १५,०००/- पेक्षा जास्त नसावे. (महसूल विभाग/बीपीएल रेशनकार्ड प्रत्/ दिव्यांगत्व पेन्शन प्रमाणपत्राची प्रत/खासदार/आमदार/जिल्हापरिषद / ग्रामप्रधान सरपंच यांच्याकडील प्रमाणपत्र) ही कागदपत्रे सोबत आणायची आहेत.
कळवा, मुंब्रा आणि दिवा येथील सर्व दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपायुक्त (समाजविकास विभाग) अनघा कदम यांनी केले आहे.