बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

ठाणे शहर वाहतूक पोलीस विभागामार्फत रस्ते सुरक्षा अभियानाची सुरुवात , रस्ते अपघात टाळण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची-  जिल्हाधिकरी अशोक शिनगारे..

अमित जाधव - संपादक

ठाणे शहर वाहतूक पोलीस विभागामार्फत रस्ते सुरक्षा अभियानाची सुरुवात

रस्ते अपघात टाळण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची
जिल्हाधिकरी अशोक शिनगारे

ठाणे दि.11  : अपघात घडण्यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन हे असून अपघात टाळण्याची जबाबदारी एका व्यक्ती किंवा यंत्रणेची नसून ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले.
ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागामार्फत 11 जानेवारी ते 17 जानेवारी 2023 या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत असून या अभियानाची सुरुवात झाली. यावेळी श्री. शिनगारे बोलत होते. ठाणे येथील टिप टॉप प्लाझा सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ठाणे शहर सह पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, ठाणे गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, ठाणे पश्चिम अप्पर पोलीस आयुक्त डॉ.पंजाबराव उगले, ठाणे पूर्व अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड व पोलीस विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
प्रवाशांना वाहतूक नियमांचे पालन करण्यास आणि वाहन चालवताना हेल्मेट किंवा सीट बेल्ट घालण्यास प्रोत्साहित करणे, रस्ते अपघात, मृत्यू किंवा दुखापत होण्याचा धोका कमी करण्यासाठी सुरक्षेच्या नवीन माध्यमांची अंमलबजावणी करण्यासाठी रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान राबविण्यात येते. हे अभियान मागील 33 वर्षापासून राबविण्यात येत आहे.
श्री. शिनगारे म्हणाले की, अपघातातील मृत्यूचे प्रमाण हे शून्यावर आणायचे आहे. अपघात कमी करण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून वेगवेगळ्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. मात्र, वाहनचालकांनीही कर्तव्यभावनेने याकडे पाहिले पाहिजे. वाहतूकीचे नियम मोडण्यासाठी नसून ते पाळण्यासाठी आहेत. नियम पाळणे हे संस्कृत समाजाचे लक्षण आहे. त्याचे पालन केले तरच अपघाताचे प्रमाण कमी होऊ शकते. अपघातात एखादी व्यक्ती दगावते, तेव्हा तिच्या संपूर्ण कुटुंबावर मोठा आघात होतो. नियम धुडकावण्याची वृत्ती, दुसऱ्याच्या मार्गात खोडा घालणे, त्याला मागे टाकून कसे पुढे जाता याईल, याचा विचार करणे, छोट्या गोष्टींमध्ये अहंकार डोकावणे या प्रवृत्ती रस्त्यावर अपघात होतात. नियम पाळण्यापेक्षा मोडण्यात पुरुषार्थ आहे, असे काहींना वाटते. त्यामुळे अपघाताची परिस्थिती उद्भवते. रस्ता सुरक्षा प्रत्येक नागरिकांच्या हातात आहे .
यावेळी श्री.कराळे म्हणाले की, घरातील कमवणारी एक व्यक्ती अपघातामध्ये मृत्यूमुखी पडली तर सपूर्ण कुंटुंब विस्कळित होते. वाहतूक सुरक्षा बद्दल ज्ञान आपल्यापर्यंत मर्यादीत न ठेवता ते इतरांना ही द्यावे जेणेकरून अपघात टाळण्यासाठी मदत होईल. वाहतूक हा सर्व नागरिकांचा विषय आहे. पालकांनी व वाहन मालकांनी आपले वाहन कोणाकडे देत आहोत, याची काळजी घेतली पाहिजे. अपघात टाळण्यासाठी मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक हे नेहमी लक्षात ठेवावे. सध्याच्या रहदारीचा विचार करता वाहनचालकाकडे एकाग्रता, चिकाटी, संयम, असे अनेक गुण अपेक्षित आहेत. वेळेची कमतरता, कामाची घाई, रस्त्यावरील स्थिती-परिस्थितीमुळे आलेला बेदरकारपणा यामुळे वाहतुकीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होते. हे रोखण्यासाठी वाहतूक विभागाकडून प्रत्येक शाळेत व सोसायटीमध्ये जाऊन रस्ते वाहतुकी बद्दल प्रबोधन करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी श्री. मोराळे, श्री. उगले, श्री. शिंदे व श्री. राठोड यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ठाणे वाहतूक विभागाने प्रकाशिक केलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच ठाण्यातील रस्ते सुरक्षा बाबतीत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कर्मचारी व नागरिकांचा सत्कार करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे