⭕️एसटी महामंडळाच्या बसच्या तिकीट दरात उद्यापासून भाडेवाढ…
अमित जाधव-संपादक
⭕️एसटी महामंडळाच्या बसच्या तिकीट दरात उद्यापासून भाडेवाढ.
मुंबई 25 ऑक्टोबर (संतोष पडवळ) : पेट्रोल व डिझेलची झालेली दरवाढ आणि दुसरीकडे महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्य जनतेला आता प्रवासासाठीही जास्त पैसे मोजावे लागणार आहे. एसटी महामंडळाने तिकीटांच्या दरात वाढ केली आहे. एसटी महामंडळाने गेल्या तीन वर्षांनंतर प्रथमच 17.17 टक्के भाडेवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला असून ही भाडेवाढ महामंडळाच्या सर्व प्रकारच्या प्रवासी वाहतूक सेवांना लागू होणार आहे. आज मध्यरात्रीपासून दरवाढ लागू होणार आहे.
इंधनाच्या दरात झालेली भरमसाठ दरवाढ, टायरच्या तसेच गाड्यांच्या सुट्या भागांच्या वाढलेल्या किमतींमुळे एसटी महामंडळाच्या तिजोरीवर पडलेला भार कमी करण्यासाठी एसटी महामंडळाने अखेर भाडेवाढ लागू केली. 25 ऑक्टोबर 2021 च्या मध्यरात्रीपासून ही भाडेवाढ होणार असून ती किमान ५ रूपयाने वाढणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली आहे. महामंडळाने भाडेवाढ केली असली तरी रातराणी गाड्यांच्या तिकिटांचे दर 5 ते 10 रूपयांनी कमी करत रात्रीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा दिला आहे.
गेल्या 3 वर्षात इंधनाच्या दरात भरमसाठ वाढ झाली आहे. दिवसेंदिवस हे दर वाढत असले तरी एसटी महामंडळाने प्रवासी दर मात्र स्थिर ठेवले होते. अशा परिस्थितीतही एसटी महामंडळाने कुठल्याच प्रवासी वाहतुकीच्या दरात वाढ केलेली नव्हती.


