दिव्यात मध्यरात्री इमारतीच्या चौथा मजल्यावरील घराला आग; सुदैवाने जीवितहानी टळली..
अमित जाधव - संपादक

ठाणे – दिवा शहरातील एकविरा गॅलेक्सी सोसायटीमध्ये मंगळवारी रात्री घराला आग लागल्याची घटना घडली. ही आग चौथ्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक ४०५ मध्ये लागली होती. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग पूर्णपणे विझविण्यात आली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाली नाही.
ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिनांक १२ मे २०२६ रोजी रात्री १०:३८ वाजण्याच्या सुमारास शीळ अग्निशमन केंद्राकडून या घटनेची माहिती प्राप्त झाली. ही घटना दिवा-आगासन रोडवरील सिद्धिविनायक गेटजवळ असलेल्या एकविरा गॅलेक्सी सोसायटी येथे घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, तळ अधिक पाच मजली इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक ४०५, मालक श्री. मोहन गुप्ता यांच्या घरात अचानक आग लागली. घटनास्थळी तत्काळ टोरंट पॉवरचे कर्मचारी तसेच अग्निशमन दलाचे जवान एक रेस्क्यू वाहन व एक फायर वाहनासह दाखल झाले.
आगीत घरातील कपाट, बेड, गादी, कपडे, भांडी तसेच इलेक्ट्रिक वायरिंग जळून मोठे नुकसान झाले आहे. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आग पूर्णपणे नियंत्रणात आणली.
या घटनेमुळे परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास सुरू आहे.



