दिवा ते सी एस एम टी अशी स्वतंत्र लोकल सुरू करा,मग दिव्यासाठी मेट्रोचे गाजर दाखवा ठाकरेंच्या शिवसेनेचे रोहिदास मुंडे यांचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला..
अमित जाधव - संपादक
दिवा:- आधी दिवा रेल्वे स्थानकातून दिवा वासियांसाठी स्वतंत्र लोकल सुरू करा आणि मग दिव्यातील नागरिकांना मेट्रोचे गाजर दाखवा असा हल्लाबोल ठाकरेंच्या शिवसेनेचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवर केला आहे.
मुख्यमंत्र्यांनी दिवा येथे आयोजित एका कार्यक्रमात दिव्यासाठी मेट्रो सर्वेक्षण करण्याबाबतची घोषणा केली.हा निवडणूक जुमला असल्याचा आरोप रोहिदास मुंडे यांनी केला आहे.मेट्रोच्या घोषणे नंतर शिंदे गटाच्या दिव्यातील नेत्यांनी दिव्याला मेट्रो मिळणार अशी चर्चा सुरू केली. मात्र दिवा शहरातील लाखो नागरिकांना नीट लोकल प्रवास करायला मिळत नाही.जीव मुठीत घेऊन रेल्वे प्रवास करावा लागतो.लोकलमध्ये येथील नागरिकांना चढायला मिळत नाही.त्यामुळे अनेक वेळा अपघात होतात. गर्दीच्या वेळेला दिवा शहरातील नागरिकांना मुंबईच्या दिशेने जायलाही मिळत नाही. दिवा स्थानकातून स्वतंत्र लोकल सीएसटीसाठी सुरू व्हावी अशी मागणी येतील लाखो नागरिकांची असताना त्याकडे दुर्लक्ष केले जाते, आणि दुसरीकडे निवडणुकांच्या तोंडावर दिवा शहरासाठी मेट्रोची गाजर दाखवली जातात असा हल्लाबोल ठाकरेंच्या शिवसेनेचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी केला आहे.
दिवा शहरात आजही तीव्र पाणीटंचाई असताना दिव्यातील 80% पाणीपुरवठा सुरळीत झाल्याची खोटी माहिती शिंदे गटाच्या दिव्यातील नेत्यांकडून दिली जात असून निवडणुकीच्या तोंडावर दहा एम एल डी पाणी वाढवण्याची घोषणा दरवर्षीप्रमाणे यावर्षी झाल्याचा आरोप रोहिदास मुंडे यांनी केला आहे. दिव्यातील जनतेला गृहीत धरण्याची मानसिकता शिंदे गटाची असल्याचे रोहिदास मुंडे यांनी म्हटले आहे.



