नाही हक्काचा बस थांबा, नाही हक्काची शेड,दिवा प्रवाशी मेटाकूटीला..* त्यात दिवा चौकातील मुख्य बस थांबा स्थलांतरीत, प्रवाशियांची संख्या रोडावली…
अमित जाधव - संपादक
ठाणे ता २० मे – दिवा शहरातील गजबजलेल्या दिवा चौक परिसरात ठाणे व नवीमुंबई परिवहन सेवेच्या बसेसची नेहमीच वर्दळ पहायला मिळत असे मात्र प्रशासनाने सदर मुख्य बस थांबा शिळ रोडवरील नॅशनल शाळेसमोर स्थलांतरीत केल्याने दिवेकर प्रवाशी मेटाकूटीला आला आहे. ठाणे किंवा नवीमुंबईला जाण्यासाठी नॅशनल शाळेसमोर जावे लागत असल्याने साधारण अर्धा किलोमीटर चालत जावे लागत असल्याने प्रवाशी संख्या सुद्धा रोडावली असल्याचे दिसून येत आहे.
दिवेकर प्रवाशांना आज तागायत ना हक्काचा बस थांबा, ना आश्रयासाठी शेड अशी गैरसोय नेहमीच पहायला मिळत आहे. त्यामुळे विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पहायला मिळत असून संबंधित दिव्यातील सर्व प्रमुख मार्गांवर हक्काचे शेडसह बसथांबे उभे करावे अशी आग्रही मागणी स्थानिक प्रवास्यांनकडून होत आहे. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी बस थांब्याजवळ खासगी वाहतूक करणाऱ्या वाहनांची वर्दळ पहावयास मिळते त्यामुळे नाईलाजस्तव आलेल्या बसेस भर रस्त्यावर उभ्या राहत असल्याने त्यातून मार्ग काढत प्रवाशांना बसमध्ये चढताना तारेवरची कसरत करावी लागते. दरम्यान लोकलच्या गर्दीमुळे बसेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद दिव्यातून मिळत असूनही मूलभूत सोयी-सुविधांअभावी प्रवासी वंचित रहात असल्याचे वास्तव चित्र पहायला मिळत आहे.
दिवा चौक परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक सक्षम केली पाहिजे तसेच इतर पर्यायी रस्ते तात्काळ बनविणे जरुरी असल्याचे मत अनेक संस्था संघटनांनी व्यक्त केले आहे. दिव्यातून ठाणे व नवीमुंबई परिवहन या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला उत्तम प्रतिसाद मिळून देखील प्रवाशांना मात्र ना हक्काचा बस थांबा, ना आश्रयासाठी शेड अशा गैरसोयीला सामोरे जावे लागत असताना आता मुख्य बस थांबा स्थलांतरीत झाल्याने प्रवासी संख्या कमी झाल्याने यांचा फटका ठाणे व नवीमुंबई परिवहन सेवेच्या उत्पन्नावर पडला असल्याचे उघडकीस आले आहे. प्रसंगी सत्ताधारीसह स्थनिक प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे असून त्यांच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.



