गुजरात निवडणुक: सुरत जिल्ह्याची जबाबदारी आ. केळकर यांच्याकडे
पंढरपूर, गोवा आणि कोल्हापूर निवडणुकांची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्यानंतर भाजप श्रेष्ठींनी गुजरात निवडणुकीत सुरत जिल्ह्याची जबाबदारी ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्यावर देण्यात आली आहे.
डिसेंबरमध्ये गुजरात विधानसभेच्या निवडणुका होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. प्रचार, नियोजन आणि संघटन अशा आघाड्यांवर काम करण्यासाठी महाराष्ट्रातील ज्येष्ठ आमदार आणि लोकप्रतिनिधींनाही जबाबदारी देण्यात आली आहे. ठाणे शहर मतदार संघाचे आमदार संजय केळकर यांना सुरत जिल्ह्यासाठी प्रवासी जिल्हा प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
सुरत जिल्ह्यात ओलपाड, गांगरोळ, मांडवी, कामरेज, बारडोली आणि महुआ हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. ओलपाड मतदारसंघात स्वतः आमदार संजय केळकर काम पाहणार असून त्यांना सहायक विकास पाटील आणि किरण धत्तूरे हे आहेत. गांगरोळमध्ये आमदार सिद्धार्थ शिरोळे, मांडवीमध्ये आमदार राम सातपुते, कामरेजमध्ये आमदार निरंजन डावखरे, बारडोलीमध्ये आमदार सुरेश भोळे आणि महूआमध्ये प्रदेश सचिव संदीप लेले काम पाहणार आहेत.
आमदार केळकर हे उद्या गुरुवारी सुरतकडे रवाना होणार असून या सहाही मतदारसंघांत त्यांच्या नेतृत्वात चार दिवस दौरे होणार आहेत.



